धडक मोहिमेतून ४५९ ग्राहकांची वीज कापली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:20 IST2017-11-10T00:20:07+5:302017-11-10T00:20:21+5:30
महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात थकबाकीदारांविरोधात ८ ते १० नोव्हेंबर दरम्यान धडक मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांनी वीज बिलाचा वेळेत भरणा करून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

धडक मोहिमेतून ४५९ ग्राहकांची वीज कापली
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात थकबाकीदारांविरोधात ८ ते १० नोव्हेंबर दरम्यान धडक मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांनी वीज बिलाचा वेळेत भरणा करून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी ४५९ ग्राहकांचा वीजपुरवठा थकबाकीमुळे ख्ांडित करण्यात आला. तर थकबाकीदारांपैकी १ हजार २३ ग्राहकांनी कारवाईचा धसका घेत पहिल्या दिवशी ३७ लाख
९५ हजार रूपयांच्या थकीत बिलाचा भरणा केला.
एकीकडे वीज बिल हाती आल्याबरोबर वीज बिलाचा भरणा करणरे ग्राहक तर एकीकडे थकबाकीदार अशा दुहेरीत महावितरण आहे. विकल्या गेलेल्या विजेचा वीज बिलाच्या माध्यमातून वसुली करून परत वीज विकत घेऊन ग्राहकांना वीज पुरवठा करण्याची जवाबदारी पार पाडताना थकबाकीदारांमुळे महावितरणला अडचणींचा सामना करावा लागत आहे. महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात घरगुती ग्राहकांकडे १३ कोटी ९७ लाखांच्या घरात थकबाकी पोहोचली आहे. तर वाणिज्यीक ग्राहकांकडे ४ कोटी ९७ लाख रूपये थकबाकी आहे. औद्योगिक ग्राहकांकडे १ कोटी २ लाख रूपये थकबाकी आहे.
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांकडे १ कोटी ४१ लाख तर सरकारी कार्यालयांकडे १ कोटी ७३ लाख रूपये थकबाकी आहे. कायमस्वरूपी वीजपुरवठा ख्ांडित केलेल्या ग्राहकांकडे ४० कोटी ३८ लाख तसेच कृषी पंपधारकाकडे ६१ कोटी ९७ लाखांची थकबाकी आहे.
महावितरणचा कारभार सुरळीत चालण्याकरिता ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक विजेच्या युनिटची वसुली होणे गरजेचे आहे. वीज ग्राहकांकडून वीजबिल विहित मुदतीत वसूल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महावितरण चंद्रपूर परिमंडळात अनेक ग्राहकांपयोगी योजना सुरू करण्यात आल्या असून दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना, एकात्मिक विद्युत विकास कार्यक्रम, इंफ्रा-२, आरएपीडीआरपी (पुर्नरचित गतिमान विद्युत विकास कार्यक्रम), नवीन कृषी पंपांना वीजपुरवठा देणे व नवीन ३३ केव्ही उपकेद्रांची निर्मिती आदी कामे सुरू आहेत. त्यातून ग्राहकांना शाश्वत वीज पुरवठ्याची हमी देण्यात आली आहे. ही कामे ग्राहकांना शाश्वत व योग्य दाबाचा वीजपुरवठा देण्यासाठी करण्यात येत आहेत. यामुळे सर्व थकबाकीदार ग्राहकांनी थकीत असलेले वीजबिल वेळेत भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.