४५ हजार टन कोळसा उत्पादन ठप्प
By Admin | Updated: May 16, 2017 00:32 IST2017-05-16T00:32:12+5:302017-05-16T00:32:12+5:30
वेकोलि माजरी प्रशासनाने नागलोन, पाटाळा, पळसगाव, माजरी गावातील लोकांची शेतजमीन संपादित करुन मोबदला दिला नाही.

४५ हजार टन कोळसा उत्पादन ठप्प
१५ कोटींचे नुकसान : प्रकल्पग्रस्तांच्या काम बंद आंदोलनाला अनेकांचे समर्थन
लोकमत न्यूज नेटवर्क
माजरी (चंद्रपूर) : वेकोलि माजरी प्रशासनाने नागलोन, पाटाळा, पळसगाव, माजरी गावातील लोकांची शेतजमीन संपादित करुन मोबदला दिला नाही. आज दोन वर्ष पूर्ण होवूनही ७८ प्रकल्पग्रस्तांना नोकरी दिली नाही. त्यामुळे या प्रकल्पग्रस्तांनी गेल्या तीन दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या काम बंदमुळे तीन दिवसात वेकोलिचे ४५ हजार टन कोळसा उत्पादन ठप्प पडले. यातून १५ कोटी रुपयांचा फटका वेकोलिला सहन करावा लागला.
गेल्या तीन दिवसांपासून कोळसा उत्पादन, ट्रान्सपोर्टीग मेटंनस व काटाघर आदी सर्वच बंद आहे. त्यामुळे खासगी ट्रान्सपोर्टींगलाही मोठा फटका बसत आहे. तेदेखील आर्थिक अडचणीत सापडले आहे. यापूर्वीच्या आंदोलनातही वेकोलिचे मोठे नुकसान झाले होते.
या काम बंद आंदोलनाला अनेक पक्ष व सामाजिक संघटनेने समर्थन दिले असून आज जिल्हा परिषदेचे सदस्य प्रवीण सूर यांनी भेट दिली व त्यांच्या समस्या जाणून घेतले. सूर यांनी माजरी वेकोलि महाप्रबंधक एम. येल्लय्या यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर तत्काळ तोडगा काढण्यास सांगितले.
तातडीने तोडगा काढण्यात न आल्यास प्रकल्पग्रस्तांसोबत इतर चारही गावातील लोकांना विश्वासात घेवून माजरीच्या संपूर्ण कोळसा खदान बंद पाडू, असा इशाराही त्यांनी दिला.
वेकोलि प्रशासनाने जून-२०१५ मध्ये शेतजमीन अधिग्रहित करुन प्रकल्पग्रस्तांना भूमिहीन केले. भूमी अधिग्रहणात ३३० प्रकल्पग्रस्त अजून १०२ प्रकल्पग्रस्तांना नोकरी दिली नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर २८ प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळाली आहे.
काँग्रेसचे माजरी अध्यक्ष रवी कुडदुला, माजी सरपंच मुरली प्रसाद रघुनंदन, प्रहार संघटनाचे अमोल डुकरे, माजरी ग्रामपंचायत सरपंच इंदुताई कुमरे, सर्व सदस्य, कामगार संघटना यांनी या आंदोलनाला समर्थन दिले आहे.