ग्रामपंचायतींचे ४५ टक्के वृक्ष नष्ट
By Admin | Updated: February 5, 2015 23:05 IST2015-02-05T23:05:39+5:302015-02-05T23:05:39+5:30
ग्लोबल वार्मिंगसारख्या अनेक समस्यांवर मात करण्यासाठी शासनाने वृक्ष लागवड योजना राबवली. मात्र, या योजनेचा पुरता फज्जा उडाला असून ग्रामपंचायतींनी लावलेले केवळ ५४.६६ टक्के वृक्ष

ग्रामपंचायतींचे ४५ टक्के वृक्ष नष्ट
मंगेश भांडेकर - चंद्रपूर
ग्लोबल वार्मिंगसारख्या अनेक समस्यांवर मात करण्यासाठी शासनाने वृक्ष लागवड योजना राबवली. मात्र, या योजनेचा पुरता फज्जा उडाला असून ग्रामपंचायतींनी लावलेले केवळ ५४.६६ टक्के वृक्ष जिवंत असल्याचा अहवाल राष्ट्रीय हरित सेना पथकाने तपासणी अहवालातून दिला आहे. या अहवालातून तिनशेच्यावर ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे.
पर्यावरणीय संतुलन कायम राखून गावाचा शाश्वत विकास हा वृक्ष लागवड योजनेचा मूळ उद्देश होता. मात्र, योजनेच्या मुळ उद्देशालाच ग्रामपंचायतींनी हरताळ फासली आहे. ग्रामपंचायतींनी वृक्ष लागवड न करता तर काहींनी केवळ देखाव्यासाठी वृक्ष लागवड करुन निधीची उचल केली आहे. वृक्ष लागवड योजनेअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीला शासनाने वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले. या उद्दिष्टाची पुर्तता करण्यासाठी रोजगार हमी योजना, १३ वा वित्त आयोग, पर्यावरण संतुलीत, ग्रामनिधीच्या माध्यमातून वृक्ष लागवड करण्यात आली. मात्र, लावलेली वृक्ष जगविण्यासाठी कोणतेही प्रयत्न करण्यात आले नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी वृक्ष लागवडीचे खड्डेच दिसतात वृक्ष मात्र गायब आहेत.
ही बाब निदर्शनास येताच वृक्ष लागवडीची चौकशी करण्याचा निर्णय शासनाने घेतला. २० नोव्हेंबर २०१४ ला रोहयो आयुक्तांनी पत्र पाठवून रोजगार हमी योजनेतून मागील तीन वर्षात ग्रामपंचायतस्तरावर करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीची विशेष तपासणी करण्याचे प्रशासनाला निर्देश दिले. तपासणीसाठी जिल्ह्यातील १७१ राष्ट्रीय हरित सेना पथकाची नियुक्ती करण्यात आली. या पथकांनी जिल्ह्यातील ७६१ पैकी २४९ ग्रामपंचायतीमधील ४२१ वृक्ष लागवड कामाची चौकशी केली. यात ४५.३४ टक्के वृक्ष नष्ट झाले. ७६१ ग्रामपंचायतींनी ७ लाख ९४ हजार ३९५ रोपांची लागवड केली. मात्र, प्रत्यक्षात ४ लाख ३४ हजार २१० रोपटेच जिवंत असल्याचे राष्ट्रीय हरित सेना पथकाच्या अहवालात म्हटले आहे.