४५ कोटींचे मुद्रांक शिल्लक
By Admin | Updated: April 17, 2015 01:04 IST2015-04-17T01:04:12+5:302015-04-17T01:04:12+5:30
विविध प्रमाणपत्रांसाठी मुद्रांकाची गरज आता शासनाने दूर केली आहे. हजार व त्यापुढील मुद्रांकाचा वापर बंद करण्यात आल्याने

४५ कोटींचे मुद्रांक शिल्लक
५०० रुपयांपुढील मुद्रांकावर बंदी : विविध प्रमाणपत्रांसाठी मुद्रांकाची गरज दूर
मंगेश भांडेकर ल्ल चंद्रपूर
विविध प्रमाणपत्रांसाठी मुद्रांकाची गरज आता शासनाने दूर केली आहे. हजार व त्यापुढील मुद्रांकाचा वापर बंद करण्यात आल्याने नागरिक समाधानी आहेत. मात्र जिल्हा कोषागार कार्यालयात मुद्रांक विक्रीबाबतची माहिती घेतली असता, २०१४-१५ या वित्तीय वर्षात न्यायिक व न्यायिकेत्तर अशा सर्व प्रकारचे तब्बल ४५ कोटी रूपयांचे मुद्रांक शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे.
शासनाने विविध योजनांसाठी पूर्वी मुद्रांकाची सक्ती केली होती. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मुद्रांकाची मागणी असायची. यासाठी जिल्हा कोषागार कार्यालय शासनाकडे एक वर्षापूर्वीच जिल्ह्याला लागणाऱ्या मुद्रांकाची मागणी करायचा. मात्र आता अनेक प्रमाणपत्रांसाठी मुद्रांकाची अट रद्द करण्यात आली आहे. साध्या कागदावरही महत्त्वाचे प्रमाणपत्र मिळत असल्याने मुद्रांकाची मागणी दूर झाली आहे. त्यामुळे २० रुपये, ५० रुपयांचे मुद्रांक कोणी घ्यायलाही तयार नाही.
तर हजार रुपयांच्या वरील सर्व मुद्रांकावर शासनाने बंदीच आणली आहे. त्यातच अनेक बँकांमध्ये फ्रॅकिंग मशीन आल्या आहेत. त्याद्वारे शासनाकडे थेट महसूल जमा होत आहे. त्यामुळे जुने मुद्रांक तसेच पडून राहिले आहेत. शासनाला विविध मार्गाने मिळणारे मुद्रांक शुल्क आता फक्त कोषागाराकडूनच राहिले नसल्यानेही ही बाब घडत आहे.
२०१३-१४ या वित्तीय वर्षात जवळपास १७० कोटींचे मुद्रांक चंद्रपूर जिल्ह्यात विकले होते. त्यानुसार २०१४-१५ यावर्षातही जवळपास तेवढ्याच मुद्रांकाची मागणी जिल्हा कोषागार कार्यालयाने राज्य शासनाकडे केली होती. मात्र तीन महिन्यांपूर्वीच्या शासन निर्णयामुळे सर्व उपकोषागारांत जवळपास ४५ कोटींचे न्यायिक व न्यायिकेत्तर मुद्रांक शिल्लक आहेत. त्यामुळे याच मुद्रांकाचा वापर चालू आर्थिक वर्षात केला जाणार आहे.
२०१३-१४ या वर्षातही मुद्रांक राहिले शिल्लक
जिल्हा कोषागार कार्यालयात २०१३-१४ या वित्तीय वर्षातही करोडो रूपयांचे मुद्रांक शिल्लक राहिले होते. मुद्रांक शिल्लक असल्यास दुसऱ्या वर्षी मागणी कमी केली जाते. मात्र या वर्षात १०००, ५०००, १०००० आणि २०००० हजारचे जवळपास ५२ हजार ३८१ मुद्रांक शिल्लक राहिले होते.
रेव्हन्यू व नोटरी स्टॉम्पही शिल्लक
जिल्हा कोषागार कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार रेव्हन्यू व नोटरी स्टॉम्पही मोठ्या प्रमाणात शिल्लक राहत असतात. तसेच इन्शुरन्स पॉलीसी स्टॉम्प, शेअत ट्रॉन्सफोर्ट स्टॉम्पही मोठ्या प्रमाणात शिल्लक आहेत.
१०, २०, ५० रूपयाच्या मुद्रांकाला मागणीच नाही
विविध प्रमाणपत्रासाठी शपथपत्र सादर करताना मुद्रांकाची गरज पडत होती. शासनाने आता ही समस्या दूर केली आहे. मात्र यापूर्वी मुद्रांक लागत असतानाही १०, २० व ५० रूपयाच्या मुद्रांकाला मागणी नव्हती. अर्जनविस यांना या मुद्रांकावर कमीशन मिळत नसल्याने ते या मुद्राकाची मागणी करीत नव्हते. परिणामी नागरिकांनाही शपथपत्रासाठी १०० किंवा त्यापेक्षा अधिक रूपयांच्या मुद्रांकाची खरेदी करावी लागत होती.
न्यायिक व न्यायिकेत्तर मुद्रांकाचा २०१४-१५ वर्षातील तपशिल
मुद्रांक (रू) प्राप्त मुद्रांक विक्री झालेले मुद्रांक शिल्लक मुद्रांक
१०/- १०९४ १०४३ ५१
२०/- २२८८९ २०४३२ २४५७
५०/- ५८९२ ५८३७ ५५
१००/- १०७५५४४ ६४२०१३ ४३३५३१
५००/- ५४८३४ २२३३९ ३२४९५
१०००/- ५६९८६ १८८७८ ३८१०८
५०००/- ४७६०१ ८१९८ ३९४०३
१००००/- १३८६४ ३००९ १०८५५
२००००/- ५९३० २१९ ५७११