४२० गावातील नागरिकांना खासगी वाहतुकीचाच आधार
By Admin | Updated: October 30, 2015 01:06 IST2015-10-30T01:06:37+5:302015-10-30T01:06:37+5:30
‘प्रवाशांच्या सेवेसाठी, गाव तेथे एसटी’ ही योजना राज्य परिवहन महामंडळामार्फत राबविली जात आहे.

४२० गावातील नागरिकांना खासगी वाहतुकीचाच आधार
चंद्रपूर : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी, गाव तेथे एसटी’ ही योजना राज्य परिवहन महामंडळामार्फत राबविली जात आहे. मात्र, जिल्ह्यातील तब्बल ४२० गावांमध्ये स्वातंत्र्याच्या ६६ वर्षांनंतरही एसटीची बस पोहचली नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांना आजही खाजगी वाहनाने किंवा पायी प्रवास करावा लागत आहे.
चंद्रपूर जिल्हा जंगलव्याप्त आहे. कोरपना, जिवती, राजुरा आदी तालुक्यातील गावे पहाडीवर वसलेले आहेत. या गावातील नागरिकांना शासनाच्या सोयीसुविधा पुरवण्याचे काम प्रशासनस्तरावरुन सुरु आहे. मात्र, दुर्गम भागातील गावांमध्ये आजही प्रशासनाच्या सोयीसुविधा पोहचू शकलेल्या नाहीत. जिल्ह्यात एकूण १६७३ गावे आहेत. यात फक्त १ हजार २३३ गावांमध्ये एसटी बस सरू करण्यात आली आहे. दुर्गम भागात पहाडावर असलेल्या गावातील नागरिकांनी आपल्या गावात एसटी बससेवा सुरू व्हावी, यासाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र, बससेवा सुरू करण्यात येत असलेल्या अडचणींमुळे अद्याप ४२० गावांमध्ये बससेवा सुरू होऊ शकलेली नाही.
ज्या गावांमध्ये राज्य परिवहन मंडळाची बससेवा उपलब्ध नाही, अशा गावांमध्ये खाजगी वाहतुकीला ऊत आला आहे. वाहतुकीची सुविधा नसल्याने प्रवाशी मिळेल त्या वाहनाने प्रवास करीत असतात. परिणामी खाजगी वाहतुकदार हे प्रवाशांना जनावरे कोंबल्यासारखे वाहनात भरून वाहतूक करीत असतात. यामुळे अनेकदा मोठे अपघातही घडले आहेत. मात्र, याची दखल घेऊन बससेवा सुरु करण्यासाठी प्रशासनाकडून तत्काळ उपाययोजना झालेल्या नाहीत.
दुर्गम भागात जंगलात, पहाडावर वसलेल्या अनेक गावांमध्ये रस्त्याची व्यवस्था नाही. तर ज्या गावांमध्ये रस्त्याचे बांधकाम झाले आहे, त्या गावात जाण्याऱ्या रस्त्याचे डांबरीकरण न झाल्याने रस्ते पुर्णत: उखडलेले आहेत.
त्यामुळे उखडलेल्या रस्त्याने बस धावू शकत नाही. उखडलेल्या रस्त्यामुळे बसगाडीचे नुकसान होत असल्याने अनेक गावांत सुरू झालेली बससेवा बंद करण्यात आल्याचाही प्रकार अनेकदा एसटी आगाराकडून घडला आहे. याचा त्रास दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागत आहे.
जिल्हा प्रशासन व परिवहन मंडळाने दुर्गम भागातील नागरिकांची प्रवासासाठी होत असलेली दमछाक थांबविण्यासाठी बससेवा सुरू करण्याची मागणी होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
बससेवेअभावी विद्यार्थ्यांची होरपळ
बससेवा सुरू नसल्याने अनेक गावातील विद्यार्थ्यांची होरपळ होत आहे. प्राथमिक शिक्षणाची गावातच सोय असली तरी हायस्कूल व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना शहरी भागात जावे लागते. मात्र बससेवाच नसल्याने विद्यार्थ्यांना वेळेवर जाता येत नाही. परिणामी अनेक गावातील विद्यार्थी हे प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर उच्च शिक्षण घेणे सोडून देत असल्याचे वास्तव्य आहे.
अपूर्ण रस्त्यांचा अडथळा
दुर्गम भागातील अनेक गावांमध्ये रस्त्याचे काम अपूर्ण आहे. गावात जाण्यास योग्य रस्ता नसल्यास उखडलेल्या रस्त्यामुळे बसगाडीचे नुकसान होते. त्यामुळे एसटी आगार ज्या गावांत योग्य रस्ते नाही, अशा गावांमध्ये बससेवा सुरू करण्यास उदासिन आहे.