मनपाचे ४२ लाखांचे शिलकी अंदाजपत्रक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2017 00:40 IST2017-03-05T00:40:29+5:302017-03-05T00:40:29+5:30
महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा आज शनिवारी मनपाच्या सभागृहात पार पडली.

मनपाचे ४२ लाखांचे शिलकी अंदाजपत्रक
स्थायी समितीची सभा : अमृत योजना, उड्डाणपुलासाठी निधीची तरतूद
चंद्रपूर : महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा आज शनिवारी मनपाच्या सभागृहात पार पडली. यात महापालिकेचे आयुक्त संजय काकडे यांनी स्थायी समितीसमोर २०१७-१८ चा ४२ लाख ४९ हजार रुपये शिलकीचा अंदाजपत्रक सादर केला. या अर्थसंकल्पाला सभापती संतोष लहामगे यांच्यासह सर्व सदस्यांनी मंजुरी प्रदान करण्यात केली असून पुढील मान्यतेसाठी आता हा अर्थसंकल्प आमसभेत सादर होणार आहे.
या अर्थसंकल्पात महानगरपालिकेचे महसुली उत्पन्न सुमारे १९४.५७ कोटी राहणार असून सर्व शासकीय अनुदाने मिळून २०१७-१८ मध्ये रुपये ३६३.९२ कोटीचे उत्पन्न गृहित धरण्यात आले आहे. सुरुवातीची शिल्लक आठ लाख १९ हजार रुपये अंदाजित करण्यात आली आहे. २०१७-१८ च्या महानगरपालिकेच्या शासकीय योजनासहित खर्च ३८१.९१ कोटी रुपये होण्याची शक्यता आहे.
यात अमृत योजना, पंतप्रधान आवास योजना, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, बाबूपेठ उडाणपूल, १४ वा वित्त आयोग इत्यादी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा समावेश असून अमृत योजनेअंतर्गत पाणीपुरवठा, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सर्वासाठी घर, १४ वा वित्त आयोगामधून घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छ महाराष्ट्र अभियान योजनेअंतर्गत शौचालय इत्यादी बाबींवर अंदाजपत्रकात भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे महानगरपालिका निधीमधून विद्यार्थ्यांकरिता मॉडेल स्कूल, दिव्यांगासाठी विशेष प्रकल्प राबविण्यात येणार आहे. तसेच स्मशानभूमी निर्माण व बगीचा विकासासाठीही या अर्थसंकल्पात बरीच तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, स्वच्छ चंद्रपूर, सुंदर चंद्रपूर या संकल्पनेसाठी पुन्हा शहर सौंदर्यीकरणावर खर्च करण्याची तयारी या अर्थसंकल्पात आहे.
याशिवाय नवीन फायर स्टेशन, वाहनतळ, पथदिवे आधुनिकीकरण इत्यादी महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे. विविध शासकीय योजनेअंतर्गत मनपा हिस्यासाठी अर्थसंकल्पात ३०.९५ कोटीची तरतूद करण्यात आली आहे.
मनपाच्या स्थायी समितीत या अंदाजपत्रकाला मंजुरी मिळाली असली तरी सर्वसाधारण सभेत यावर जोरदार चर्चा होणार असल्याची चर्चा मनपा वर्तुळात आहे. (शहर प्रतिनिधी)