ग्रामपंचायतीमध्ये ४० टक्के तरुण कारभारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:29 IST2021-01-19T04:29:56+5:302021-01-19T04:29:56+5:30
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ६०४ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली. यावर्षी पहिल्यांदाच अधिकाधिक तरुणांनी निवडणूक लढविली. ४० टक्के ग्रामपंचायतींवर तरुण ...

ग्रामपंचायतीमध्ये ४० टक्के तरुण कारभारी
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ६०४ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली. यावर्षी पहिल्यांदाच अधिकाधिक तरुणांनी निवडणूक लढविली. ४० टक्के ग्रामपंचायतींवर तरुण उमेदवार निवडून आले. त्यामुळे या ग्रामपंचायतींना हे तरुण उमेदवार नवी दिशा देतील, अशी आशा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
मागील काही वर्षांमध्ये तरुणपिढी राजकारणात फारशी येत नव्हती. मात्र, यावर्षी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये बहुतांश गावांत तरुणांनीच पॅनल उभे करून निवडणूक लढविली. गावाच्या विकासासाठी ग्रामस्थांनीही त्यांना साथ देत निवडून दिले. जिल्ह्यात ४० टक्के गावात तरुण कारभारी झाले आहेत. त्यामुळे ही तरुण मंडळी पुढील पाच वर्षांत गावाचा विकास करून गावाचे नाव जिल्ह्यातच नाही, तर राज्यात पुढे नेतील, असा विश्वास मतदारांनी व्यक्त केला आहे.
निवडणूक झालेल्या ग्रामपंचायती
६०४
---
निवडून आलेले उमेदवार ४१९१
---
१८ ते ३२ वयोगटातील उमेदवार
१६००
---
कोट
गाव आणि देशाच्या विकासासाठी तरुणांनी राजकारणात येणे गरजेचे आहे. आपण पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात होतो. ग्रामस्थांनी भरभरून प्रेम दिले आणि तब्बल ३५२ मतांना निवडून दिले. आता गावाच्या विकासाकडे अधिकाधिक लक्ष केंद्रित केले जाईल.
- साईश सतीश वारजूकर
सदस्य, ग्रामपंचायत, शंकरपूर
----
तरुणांनी राजकारणात आल्यास गावासह देशाचा विकास शक्य आहे. त्यामुळे आपण ग्रामपंचायत निवडणूक लढविली. मतदारांनी निवडून देत आपल्यावर विश्वास टाकला. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता गावात अधिकाधिक विकास कामे करण्याचा प्रयत्न राहणार आहे.
-चेतन बंडू बोबाटे
सदस्य, ग्रामपंचायत, गोवरी
---
राजकारणात तरुणपिढीने येणे गरजेचे आहे. त्याशिवाय ग्रामीण भागाचा विकास शक्य नाही. त्यामुळेच आपण निवडणूक लढविली आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये गावात नागरिकांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यावर भर राहणार आहे.
-संदीप घोटेकर
चंदनवाही,राजुरा
---
उमेदवारांचे व्हिजन
मागील काही वर्षांमध्ये राजकारणाकडे बघण्याच्या दृष्टिकोन बदलला आहे. त्यामुळे अधिकाधिक सुशिक्षित तरुणांनी राजकारणात येऊन देशाचा विकास करणे गरजेचे आहे. गावाचा विकास झाल्यास देशाचा विकास शक्य आहे. त्यामुळे गावात सर्व सुविधा पुरविणे अत्यावश्यक आहे.
----------------
चिमूर तालुक्यात सर्वाधिक तरुण उमेदवार
जिल्ह्यातील ६०४ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली. यामध्ये ४० टक्के तरुण उमेदवार निवडून आले. विशेष म्हणजे, या निवडणुकीत प्रथमच सर्वाधिक तरुण चेहरे निवडून आले आहेत. यामध्ये चिमूर तालुक्यात तरुण आणि सुशिक्षित उमेदवारांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.