४ कोटींचा खर्च; तरीही विद्यार्थिनींचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:25 IST2017-07-18T00:25:38+5:302017-07-18T00:25:38+5:30

शासनाच्या महत्त्वाकांक्षी मानव विकास मिशन उपक्रमातंर्गत राज्यभरात विद्यार्थिनींसाठी बसगाड्या सुरू करण्यात आल्या.

4 crores expenditure; Still threatens the lives of the girl students | ४ कोटींचा खर्च; तरीही विद्यार्थिनींचा जीव धोक्यात

४ कोटींचा खर्च; तरीही विद्यार्थिनींचा जीव धोक्यात

एसटी महामंडळाचा कारभार : विद्यार्थिनींच्या बसमध्ये अन्य प्रवाशांची वाहतूक
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शासनाच्या महत्त्वाकांक्षी मानव विकास मिशन उपक्रमातंर्गत राज्यभरात विद्यार्थिनींसाठी बसगाड्या सुरू करण्यात आल्या. मात्र या बसगाड्यांमधून विद्यार्थिनी कमी आणि प्रवाश्यांचीच अधिक वाहतूक केली जात आहे. मानव विकास मिशन अंतर्गत जिल्हाभरात ७७ बसगाड्या आरक्षीत असून विद्यार्थिनींच्या प्रवासासाठी एसटी महामंडळाला डिझेल खर्च म्हणून एका बसमागे वार्षिक ६ लाख रूपये असे ४ कोटी ४२ लाख रूपये दरवर्षी दिले जात आहेत. मात्र एसटी महामंडळाच्या मुजोरीने विद्यार्थिनी कमी आणि प्रवाश्यांचीच जास्त वाहतूक होत असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
ब्रह्मपुरी तालुक्यातील गांगलवाडी येथे बसमध्ये उभ्याने प्रवास करणारी विद्यार्थिनी दारावर उभी असताना धावत्या बसमधून खाली पडल्याची घटना आठ दिवसांपुर्वी घडली. या घटनेमुळे शालेय विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मानव विकास मिशनच्या बसगाड्यांमध्ये विद्यार्थिनींनाच बसण्यासाठी सीट मिळत नाही, असे बरेचदा घडते. बसमध्ये विद्यार्थिनींना प्रथम स्थान देण्यात आले असले तरी अनेक प्रवासी विद्यार्थिनींना बसण्यासाठी जागा देत नाही. त्यामुळे सावित्रीच्या लेकींना उभ्याने प्रवास करावा लागत आहे.
शासनाच्या निर्देशानुसार मानव विकास मिशनच्या बसगाड्यांद्वारे शालेय वेळात फक्त विद्यार्थिनींची वाहतूक करणे आवश्यक आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. शालेय वेळात येणार बसगाडी ही इतर प्रवाशांनी गच्च भरून असते. अशावेळी एकच बसगाडी असल्यास विद्यार्थिनी त्याच बसने उभ्याने प्रवास करतात. बसचा वाहकही विद्यार्थिनींना सीट मिळवून देण्यासाठी प्रयत्न न करता दमदाटी करताना दिसून येतात. त्यामुळे विद्यार्थिनींच्या अडचणी वाढल्या असून याकडे वेळीच लक्ष देऊन केवळ विद्यार्थ्यांसाठी बसगाडी सोडण्याची मागणी पालकांकडून होत आहे.

नियम डावलून जिल्हाअंतर्गत वाहतूक
शासनाच्या निर्देशानुसार मानव विकास मिशनच्या एका बसने दिवसभरात कमीत कमी १२० विद्यार्थिनींची वाहतूक करणे आवशक्य आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. तसेच मानव विकास मिशनच्या बसने शाळेला सुट्टी असण्याच्या दिवशी वगळून इतर दिवशी जिल्ह्याबाहेर प्रवाशांची वाहतूक करू नये, असे म्हटले आहे. मात्र या बसगाड्यांद्वारे सर्रासपणे जिल्हातंर्गत वाहतूक केली जाते. याबाबत वारंवार नोटीस पाठवूनही एसटी महामंडळ दखल घेत नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

२५३ शाळांच्या सहा हजार विद्यार्थिनी
मानव विकास मिशन अंतर्गत यावर्षी पासचे वाटप सुरू असून अद्याप आकडेवारी उपलब्ध नाही. मात्र गतवर्षी जिल्ह्यात ६ हजार १९९ विद्यार्थिनींनी या योजनेतून शालेय प्रवास केला. मानव विकास मिशन योजनेत पंधरा तालुक्यातील ६१८ गावांचा समावेश असून २५३ बसफेरीत समाविष्ठ शाळा आहेत.

बसगाडी केवळ विद्यार्थिनींसाठी असली तरी बसमध्ये चढलेल्या इतर प्रवाशाला उतरविण्याची हिमंत चालक व वाहक करू शकत नाही. अनेक गावांमध्ये एकच बसफेरी असते. एसटी महामंडळाकडे कर्मचारी, चालक व वाहकांची कमतरता आहे. केवळ विद्यार्थिनींसाठी बसफेऱ्या सुरू करण्यास अडचणी आहेत. मानव विकासच्या बसगाड्यांमध्ये विद्यार्थिनींना प्रथम प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. गांगलवाडी घटनेची चौकशी सुरू आहे.
- निलेश बेलसरे
विभागीय वाहतूक अधिकारी, चंद्रपूर

Web Title: 4 crores expenditure; Still threatens the lives of the girl students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.