३७० कोल्हापुरी बंधारे नादुरूस्त
By Admin | Updated: February 28, 2015 01:20 IST2015-02-28T01:20:24+5:302015-02-28T01:20:24+5:30
जिल्हा परिषद सिंचाई विभागामार्फत १०० हेक्टर पर्यंत विविध सिंचन योजना कार्यान्वीत आहेत. मात्र, या सिंचन प्रकल्पांची योग्य देखभाल होत नसल्याने हे प्रकल्प ...

३७० कोल्हापुरी बंधारे नादुरूस्त
चंद्रपूर : जिल्हा परिषद सिंचाई विभागामार्फत १०० हेक्टर पर्यंत विविध सिंचन योजना कार्यान्वीत आहेत. मात्र, या सिंचन प्रकल्पांची योग्य देखभाल होत नसल्याने हे प्रकल्प शेतकऱ्यांसाठी कुचकामी ठरत आहेत. जिल्ह्यातील ६३९ कोल्हापुरी बंधाऱ्यांपैकी तब्बल ३७० बंधारे हे फुटलेले आहेत. त्यामुळे या बंधाऱ्यांचा शेतकऱ्यांना कोणताच लाभ होत नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.
जिल्हा परिषद सिंचाई विभागामार्फत ८५ लघु पाटबंधारे तलाव, १६७८ माजी मालगुजारी तलाव, ५ पाझर तलाव, २८ गाव तलाव व ६३९ कोल्हापुरी बंधारे आहेत. तलाव व बंधाऱ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सिंचनाची सोय झाली असली तरी, अल्पवधीत हे बंधारे फुटले आहेत. सिंचन वाढीसाठी ८ लघु पाटबंधारे तलाव, ४३९ माजी मालगुजारी तलाव व ३७० कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरूस्ती आवश्यक असल्याचे सिंचाई सिंचाई विभागाने म्हटले आहे.
दुरूस्तीस पात्र ४३९ माजी मालगुजारी तलावांपैकी विदर्भ सघन सिंचन विकास कामातंर्गत ३१५ तलावाच्या दुरूस्तीचे कामे हाती घेण्यात आले आहेत, असे कार्यकारी अभियंता लघु सिंचाई विभाग जिल्हा परिषद यांनी म्हटले आहे. तसेच २२ कामे जिल्हा परिषद सेस निधी अंतर्गत मंजूर तर तर २९ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. उर्वरीत ३३ कामे सेस निधीतून सन २०१५-१६ मध्ये व ४० कामे २०१६-१७ मध्ये प्रस्तावित करण्यात येतील, असेही कार्यकारी अभियंता यांनी म्हटले आहे.
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत ग्रामपंचायत स्तरावर ४८७ तलावातील गाळ काढण्याची कामे प्रस्तावित करण्यात आली आहे. व २०१४-१५ च्या नियोजनापैकी सेल्फवर असलेली दुरूस्तीची ७४ कामे घेण्यात आल्याचेही म्हटले आहे. मात्र, अनेक तलावात पाणी साचून राहते.
परिणामी गाळ उपसा करण्यास अडचणी येतात. अशा परिस्थतीत गाळ उपसा करण्याचे कामे होणार कशी, प्रश्न नागरिकांनी केला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)