वर्षांतून ३६५ ही दिवस चालणारी जि. प. शाळा पालडोह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:29 IST2021-04-02T04:29:02+5:302021-04-02T04:29:02+5:30
संघरक्षित तावाडे जिवती : जिवती तालुका हा मागास आणि दुर्गम, नक्षलग्रस्त मानला जातो. या तालुक्यातील पालडोह येथील जिल्हा परिषद ...

वर्षांतून ३६५ ही दिवस चालणारी जि. प. शाळा पालडोह
संघरक्षित तावाडे
जिवती : जिवती तालुका हा मागास आणि दुर्गम, नक्षलग्रस्त मानला जातो. या तालुक्यातील पालडोह येथील जिल्हा परिषद शाळा आपल्या विविध उपक्रमामुळे जिल्ह्यात प्रसिद्ध झाली आहे. वर्षाच्या ३६५ ही दिवस ही शाळा सुरू असते. खुद्द जि. प. चे मुख्य कार्यपालन अधिकारी राहुल कर्डिले यांनी या शाळेला भेट दिली.
राहुल कर्डिले साहेब यांना शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश करताच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शाळेत प्रवेश करून त्यांनी वर्गाची पाहणी केली. वर्गात विद्यार्थी अध्यापन करत होती. वर्ग आठवीमधील युवराज पवार याने गणिताची तासिका घेतली. यावेळी कर्डिले यांनी मुलांचे छंद जाणून घेतले. सोबत त्यांच्या भविष्यात काय अपेक्षा आहेत हे जाणून घेतले. मीरा पांचाळ हिने स्वरचित कविता गायन करून दाखवली.
त्यानंतर वर्ग सातवीला भेट दिली. त्या वर्गात अविद्या पवार ही अध्यापन करत होती. त्यांचे अध्यापन पाहून कर्डिले आनंदित झाले व ही शिकवण्याची पद्धत त्यांना खूपच आवडली. मुले स्वतः अध्यापन करतात हे त्यांना खूपच आवडले व याविषयी काहीतरी नवीन उपक्रम सुरू करता येईल का, असे त्यांनी बोलून दाखवले.
त्यानंतर यांनी नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्राला भेट देऊन प्रयोगाची पाहणी केली.
नंतर सामाजिक अंतर ठेवून मास्क घालून छोटेखानी मार्गदर्शन कार्यक्रम झाला. यावेळी तहसीलदार पाटील, राजगिरे, पाणघाटे, कुचनकर, गट विकास अधिकारी पेंदाम, बिट शिक्षण अधिकारी मालवी, केंद्र प्रमुख कोहपरे, मुख्याध्यापक परतेकी उपस्थित होते.
बॉक्स
३६५ दिवसांत विविध उपक्रम
पालडोह येथील जि. प. शाळा वर्षभर सुरू असते. अध्यापनासोबतच या शाळेत विविध उपक्रमही राबविले जातात. सकाळी व्यायाम, योगासने नित्यनेमाने सुरू असते. ज्या दिवशी शासकीय सुटी असते, त्या दिवशी व रविवारीदेखील ही शाळा सुरूच असते. विशेष म्हणजे सुटी दिवशी विद्यार्थीदेखील शाळेत येऊन विविध उपक्रम करतात.
बॉक्स
सीईओंचा मुक्तसंवाद
सीईओ राहुल कर्डिले यांनी यावेळी सर्व मुलांशी मुक्त संवाद साधला. त्यात त्यांनी मुलांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या व गावातील समस्या समजून घेऊन त्या दूर करण्याचे आश्वासन दिले. विद्यार्थ्यांच्या भविष्यातील इच्छा काय आहे हे जाणून घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी माझी कधीही गरज लागली तर मी तुमच्या सोबत आहे, असे त्यांनी मुलांना आश्वासन दिले.