३३ वर्षांनी मिळाले गोसीखुर्दचे पाणी
By Admin | Updated: September 14, 2015 01:00 IST2015-09-14T01:00:43+5:302015-09-14T01:00:43+5:30
बहुप्रतीक्षित गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी आसोलामेंढा तलावात रविवारी सोडण्यात आले.

३३ वर्षांनी मिळाले गोसीखुर्दचे पाणी
चंद्रपूर/सावली : बहुप्रतीक्षित गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी आसोलामेंढा तलावात रविवारी सोडण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली शेतकऱ्यांची मागणी तब्बल ३३ वर्षांनंतर पूर्ण झाली आणि गोसीखुर्द धरणाचे पाणी रविवारी चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झाले. या प्रकल्पाच्या पाण्यामुळे मूल, सावली व पोंभुर्णा या तीन तालुक्यातील शेकडो हेक्टर जमीन सिंचीत होणार असल्याने शेतकऱ्यांत आनंद पसरला आहे.
सावली तालुक्यातील उसरपार चक या गावात राज्याचे वित्त व नियोजनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत रविवारी जलपुजन कार्यक्रम पार पडला. उसरपार चकच्या सरपंच कल्पना लोहंबरे यांच्या हस्ते जलपुजन करण्यात आले. यावेळी बोलताना ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, गोसीखुर्द धरणाचे पाणी असोलामेंढा तलावात सोडण्यात यावे, ही शेतकऱ्यांची मागणी आज पूर्णत्वास येत आहे, ही अतिशय आनंदाची बाब आहे. परिसरातील शेतकऱ्यांच्या सिंचन विषयक सोयीच्या दृष्टीने आवश्यक कामे जलदगतीने पूर्ण व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील असून निधी कमी पडून न देण्याची ग्वाही त्यांनी दिली. ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले, गोसीखुर्द प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यासाठी वरदान ठरावा या दृष्टीनेसुध्दा आपण प्रयत्नशील असून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, त्यांचे सुख यातच देशाच्या विकासाचे गमक आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचन विषयक सोयी उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबध्द असल्याचे ना. मुनगंटीवार यावेळी सांगितले.
कार्यक्रमाला खा. अशोक नेते, आ. शोभा फडणवीस, भाजपाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार प्रा. अतुल देशकर, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले, जि. प. सदस्य वैशाली कुकडे, प्रमोद कडू, पं. स. सदस्य धर्मा सिडाम, हरीश शर्मा, देवराव मुद्दमवार, सतिश बोम्मावार, भालचंद्र बोदलकर, सुभाष कासनगोट्टुवार, अमोल कोंडबत्तुनवार, यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी, शेतकऱ्यांची उपस्थिती होती. संचालन भाजप कार्यकर्त्या पूनम झाडे यांनी तर आभार पं. स. सदस्य अविनाश पाल यांनी मानले.(प्रतिनिधी)
मामा तलावांच्या दुरूस्तीसाठी २०० कोटींचा निधी देऊ
माजी मालगुजारी तलावांच्या दुरुस्तीसाठी यावर्षी १०० कोटी रूपये निधी राज्य शासनाने उपलब्ध केला आहे. सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत चांगला आराखडा तयार केल्यास पुढील वर्षी मामा तलावांच्या दुरूस्तीसाठी राज्य सरकार २०० कोटी रूपये निधी उपलब्ध करून देईल, असे ना. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.
मुख्य नहरातून आसोला मेंढा तलावाच्या
दिशेने पाणी प्रवाहित
गोसीखुर्द धरणाचे पाणी चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळावे, यासाठी कित्येक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. त्यातच गराडी नाल्यावर पाईपलाईन टाकण्यासाठी महिनाभरापासून काम सुरू होते. ९ सप्टेंबरला गोसीखुर्द धरणातून पाणी सोडण्यात आल्यानंतर डाव्या कालव्याच्या मुख्य नहरातून ९९ किमीचा प्रवास करून रविवारी २ वाजून १० मिनीटानी पहिल्यांदा पाणी आसोलामेंढा तलावाच्या दिशेने प्रवाहीत झाले.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार दिलासा
यावर्षी जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्याने दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. अनेकांची शेतपिके पाण्याअभावी करपण्याच्या मार्गावर आहेत. गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी आसोलामेंढा तलावात पोहोचल्याने या तलावाच्या माध्यमातून पाणी शेतकऱ्यांना वितरीत केले जाणार आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी आशा आहे.
दोन वर्षापूर्वी झाली होती चाचपणी
गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यासाठी दोन वर्षापूर्वी चाचपणी झाली होती. मात्र प्रकल्पाचे पाणी गराडी नाल्यावरील सेतूवर पोहोचताच सेतू क्षतीग्रस्त झाला होता. त्यानंतर सिंचन जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन सेतूचे काम पूर्ण केल्याने आज आसोलामेंढा तलावात पाणी दाखल झाले आहे.