३३ लघु व माहितीपटांचे प्रदर्शन
By Admin | Updated: February 27, 2017 00:36 IST2017-02-27T00:36:39+5:302017-02-27T00:36:39+5:30
तीन दिवस चाललेल्या पहिल्या चांदा इंटरनॅशनल डॉक्युमेंटरी फिल्म फेस्टिव्हलचा समारोप रविवारी करण्यात आला.

३३ लघु व माहितीपटांचे प्रदर्शन
स्थानिक कलावंतांचा सहभाग : चांदा इंटरनॅशनल डॉक्युमेंटरी फिल्म फेस्टिव्हलचा समारोप
चंद्रपूर : तीन दिवस चाललेल्या पहिल्या चांदा इंटरनॅशनल डॉक्युमेंटरी फिल्म फेस्टिव्हलचा समारोप रविवारी करण्यात आला. या आंतरराष्ट्रीय महोत्सवात तब्बल ३३ लघुपट व माहितीपटांचे प्रदर्शन करण्यात आले. त्यामध्ये चंद्रपूर येथील चित्रपट निर्मात्यांचे ‘नीव’ आणि ‘नूर’ हे दोन लघुपटही दाखविण्यात आले. समारोपीय दिवशी या दोन्ही लघु चित्रपटांना चंद्रपूरच्या प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. याशिवाय चंद्रपूर जिल्ह्यातील ५० पेक्षा अधिक सर्जनशील कलावंतांना चित्रपट निर्मितीबाबत आयोजित कार्यशाळेत प्रशिक्षण देण्यात आले.
या तीन दिवसांच्या माहितीपट महोत्सवाचे खास आकर्षण ग्रीन आॅस्कर पुरस्कार विजेते माईक पांडे व मराठी चित्रपट निर्माते किरण शांताराम होते. केंद्र सरकारच्या माहिती व जनसंपर्क खात्याअंतर्गत फिल्म डिव्हिजन आणि राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ना. अहीर यांनी पाकिस्तानातून होणारी अंमली पदार्थाची तस्करी देशासाठी घातक असल्याचे सांगितले. त्यांनी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्राध्यापक विद्यार्थ्यांना भडकावण्याचे काम करीत असल्याचा आरोप केला.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ग्रीन आॅस्कर विजेते माईक पांडे यांनी कार्यशाळेत सहभागी स्थानिक कलावंतांना चित्रपट निर्मितीबाबत मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे नवीन काही करण्याची प्रेरणा मिळाल्याचे कार्यशाळेला उपस्थित युवकांनी सांगितले. या माहितीपट महोत्सवात सहभागी, प्रेक्षक, कलावंत, युवक आदी सर्वांचे अनुभव कथनाचे चित्रीकरण फिल्म डिव्हिजनच्या पथकाने केले.
तिसऱ्या दिवशी चंद्रपूरचे माहितीपट व लघुपट निर्माते शैलेश दुपारे व वरदान टिपले यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. त्यांनी कार्यशाळेत सहभागी कलावंतांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. दिवसभर लघुचित्रपट आणि माहितीपट दाखविण्यात आल्यानंतर रात्री महोत्सवाचा सांगता समारंभ झाला. (प्रतिनिधी)
महोेत्सवात दाखविलेले लघु चित्रपट-माहितीपट
शोअर आॅफ सायलेन्स : व्हेल्स शार्क्स इन इंडिया (इंग्रजी), व्ही. शांतराम-द पायोनिअरिंग स्पिरिट (इंग्रजी), गूड मॉर्निंग मुंबई (इंग्रजी), ट्रु लव्ह स्टोरी (इंग्रजी), लावणी- ए परफॉर्मिंग आॅफ आॅफ महाराष्ट्र (इंग्रजी), व्हॅनिशिंग ग्लेशिअर (इंग्रजी), लिव्हिंग द नेचर वे (इंग्रजी), ए सर्टेन लिबरेशन (बांग्ला), अली अँड द बॉल (इंग्रजी), पैगाम वापसी का (हिंदी), तेपूर-१९६२ (इंग्रजी), बे्रकिंग आॅल द वे (इंग्रजी), वेट - राह (अॅनिमेशन), उकडी-पुकडी (अॅनिमेशन), फेमस इन अहमदाबाद (इंग्रजी), फायरफ्लिज इन द अॅबिस (इंग्रजी), डॉ. विश्वेस्वरय्या (इंग्रजी), विक्रम साराभाई (इंग्रजी), होमी भाभा (इंग्रजी), जगदीशचंद्र बोस (इंग्रजी), इन सर्च आॅफ फेडिंग कॅनव्हास (इंग्रजी), द लास्ट मँगो बिफोर द मान्सून (मराठी), फिशरमॅन अँड तूक..तूक, होम डिलिव्हरी (इंग्रजी), सुपरस्टार आॅफ कोटी (इंग्रजी), नीव- द फाऊंडेशन (बांग्ला), नूर (हिंदी), लिटल टेररिस्ट (इंग्रजी), राजू अँड आय (इंग्रजी), गोल्डन मँगो (मराठी), राईडिंग सोलो टू द टॉप आफ द वर्ल्ड (इंग्रजी), माय नेम इज सॉल्ट (इंग्रजी), मोन्टेज (हिस्टरी आॅफ इंडियन सिनेमा) (इंग्रजी).
फिल्म डिव्हिजनच्या अधिकाऱ्यांचा ठिय्या
चंद्रपूरसारख्या दुर्गम भागात होत असलेला पहिलाचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा माहितीपट महोत्सव यशस्वी करण्यासाठी फिल्म डिव्हिजनचे वरिष्ठ अधिकारी तीन दिवस चंद्रपुरात ठिय्या मांडून होते. फिल्म डिव्हिजनचे महानिदेशक मनीष देसाई, प्रशासकीय निदेशक स्वाती पांडे, मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे समन्वय अनिलकुमार एन., मनोहरसिंग बिस्ट, ए.के. महाराजा यांच्यासह १२ अधिकाऱ्यांचे पथक संपूर्ण व्यवस्थेवर लक्ष ठेवून होते.
हंसराज अहीर यांच्या
पुढाकाराने महोत्सव
केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा चंद्रपूरचे सुपुत्र ना. हसंराज अहीर यांच्या पुढाकाराने हा माहितीपट महोत्सव चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला. सरदार पटेल मेमोरिअल सोसायटीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे, आणि प्राचार्य कीर्तीवर्धन दीक्षित यांनी महोत्सवासाठी विशेष रूची दाखविली. त्याचा लाभ स्थानिक कलावंतांना मिळाला. ना. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरचे दारूबंदी, ताडोबा व वृक्ष लागवडीवर माहितीपट बनविण्यासाठी पत्र दिले आहे.
आयडिया..पॅशन..क्रिएटिव्हिटी
सुरत येथील एनआयटीमधून बीटेक झालेला चंद्रपूरचा सुपुत्र वरदान टिपले मुंबईच्या मायानगरीत नशीब आजमावितो आहे. बीटेक केल्यावर वरदानने थेट चित्रपट निर्मितीचे प्रशिक्षण घेतले आणि त्याच्या ‘नीव - द फाऊंडेशन’ या माहितीपटाला अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील सबॉस्टोकोल डॉक्युमेंटरी फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘ज्युरी अवार्ड’ प्राप्त केला आहे. त्याने बीटेक पूर्ण केल्यावर कलकत्ता गाठून सत्यजित रॉय फिल्म अँड टेलिव्हिजन इंस्टिट्यूटमधून चित्रपट निर्मितीचे प्रशिक्षण पूर्ण केले. अशीच काहीशी कथा शैलेष भीमराव दुपारे याची आहे. ‘लोकमत’शी बोलताना वरदान टिपले याने नवीन क्षेत्रात सर्जनशीलता दाखवायची असेल तर नवीन ‘आयडिया’ हवी आणि ती पूर्ण करण्याचे ‘पॅशन’ असले पाहिजे, असे आपले गुपित सांगितले. करिअर करण्यासाठी माहितीपटात मानवी भावनांचा ओलावा असणे आवश्यक आहे, असेही तो म्हणाला. त्याचा आगामी माहितीपट मुंबईमधील गिरणी कामगारांच्या जीवनावर आहे. त्या काळी ते कामगार खेळत असलेल्या खेळाबाबत त्यात माहिती राहणार आहे.