जिल्हा परिषद शाळांना हव्या ३२६ नवीन वर्ग खोल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2015 00:41 IST2015-12-31T00:41:33+5:302015-12-31T00:41:33+5:30

जिल्हा परिषद मार्फत जिल्ह्यात १ हजार ५७२ प्राथमिक शाळा सुरू आहेत. मात्र अनेक शाळांमध्ये वर्ग खोल्यांची कमरता आहे.

326 new classrooms to the zilla parishad schools | जिल्हा परिषद शाळांना हव्या ३२६ नवीन वर्ग खोल्या

जिल्हा परिषद शाळांना हव्या ३२६ नवीन वर्ग खोल्या

बसण्यासाठी अडचण : अनेक ठिकाणी दोन वर्गाचे विद्यार्थी बसतात एकत्र
मंगेश भांडेकर चंद्रपूर
जिल्हा परिषद मार्फत जिल्ह्यात १ हजार ५७२ प्राथमिक शाळा सुरू आहेत. मात्र अनेक शाळांमध्ये वर्ग खोल्यांची कमरता आहे. वर्ग खोल्यांचे बांधकाम करण्याची मागणी गावकऱ्यांकडून सतत होत असतानाही याकडे जिल्हा परिषद प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. परिणामी अनेक शाळेतील विद्यार्थ्यांना दोन वर्गाचे विद्यार्थी मिळून किंवा शाळा परिसरातील झाडाखाली, वऱ्हाड्यांत बसून शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहे.
जिल्हा परिषदेमार्फत सध्यास्थितीत १ हजार ५७२ प्राथमिक शाळा, २१ माध्यमिक शाळा व ३ जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा सुरू आहेत. यासाठी जिल्हा परिषद प्रशासनामार्फत सध्यास्थितीत ६ हजार ५२० वर्ग खोल्या आहेत. मात्र अजूनही नवीन ३२६ वर्ग खोल्यांची आवश्यकता आहे. चालु सत्रात जिल्हा परिषदेच्या १ हजार ५७२ शाळांमध्ये १ लाख १५ हजार १७३ विद्यार्थी पटसंख्या आहे. तर २१ माध्यमिक शाळांमध्ये ४ हजार ९५७ व ३ उच्च माध्यमिक शाळांमध्ये २ हजार २०१ विद्यार्थी शिक्षण घेत आहे.
मात्र वर्ग खोल्यांची अडचण शिक्षकांना अध्यापन प्रक्रियेत येत असल्याने अनेकदा दोन वर्गाच्या विद्यार्थ्यांना एकत्र करून किंवा शाळा परिसरातील झाडाखाली तसेच वऱ्हांड्यात बसवून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे द्यावे लागत आहे. शाळा व्यवस्थापन समित्यांमार्फत वर्ग खोली बांधकामासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. मात्र जिल्हा परिषद प्रशासन शाळांना नव्या वर्ग खोल्या बांधून देण्यास दिरंगाई करीत आहे.
२०१४-१५ या शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषद प्रशासनाकडून ७५ वर्ग खोल्यांचे बांधकाम झाले आहे. यामुळे काही शाळांमध्ये वर्ग खोल्यांचा प्रश्न मिटला आहे. मात्र आजही ३२६ नव्या वर्ग खोल्यांची आवश्यकता असल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने निधी उपलब्ध करून देऊन नवीन वर्ग खोल्यांचे बांधकाम करून देण्याची मागणी शाळा व्यवस्थापन समित्यांकडून होत आहे, याची प्रशासनाने दखल घ्यावी.

अध्यापनावर परिणाम
वर्गखोल्यांची कमतरता असल्यास अनेकदा दोन वर्गाच्या विद्यार्थ्यांना एकत्र किंवा शाळा परिसरातील झाडाखाली व वऱ्हाड्यांत बसवून धडे दिले जाते. मात्र अशावेळी विद्यार्थ्यांचे लक्ष अध्यापनात लागत नाही. तिथे घडणाऱ्या गोष्टी त्यांच्या नजरेत पडत असल्याने विद्यार्थ्यांचे लक्ष विचलीत होत असते.

इमारतींची व्हावी दुरूस्ती
अनेक जिल्हा परिषद शाळांच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पाणी गळत असते. दरवर्षी डागडुजी करून वर्ग भरविले जातात. मात्र दरवर्षीच अशा समस्या उद्भवत असल्याने इमारतींची चांगल्या प्रकारे दुरुस्ती करण्याची मागणी आहे.

शासकीय अनुदानातून खर्च निरंक
शाळांमध्ये विविध सुविधा पुरविण्यासाठी शासकीय अनुदान मिळत असते. मात्र २०१४-१५ या वर्षात सर्व व्यवस्थापनामध्ये शासकीय अनुदातून कोणतीही कामे करण्यात आलेली नाही. कार्यालय भवनासाठी साधन सामुग्री, इमारत बांधकाम दुरूस्ती, वसतिगृह, आकस्मीक खर्च, ग्रंथालय अशा बाबींसाठी शासकीय अनुदान खर्च करायचे असते. मात्र यावर्षीचा खर्च निरंक आहे.

Web Title: 326 new classrooms to the zilla parishad schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.