३१ हजार ६५ विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा
By Admin | Updated: February 28, 2017 00:33 IST2017-02-28T00:33:14+5:302017-02-28T00:33:14+5:30
उच्च माध्यमिक शालांत परीक्षेला २८ फेब्रुवारी मंगळवारपासून सुरूवात होत आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी शिक्षण विभागाने तयारी पूर्ण केली असून ...

३१ हजार ६५ विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा
जिल्हाभरात १२६ केंद्रांवर परीक्षा : सहा भरारी पथकांची राहणार नजर
चंद्रपूर : उच्च माध्यमिक शालांत परीक्षेला २८ फेब्रुवारी मंगळवारपासून सुरूवात होत आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी शिक्षण विभागाने तयारी पूर्ण केली असून जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेसाठी ७५ केंद्र ठेवण्यात आले आहेत. ३१ हजार ६५ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार असून गैरप्रकार रोखण्यासाठी सहा भरारी पथकांची नजर राहणार आहे.
बारावीची परीक्षा २५ मार्च पर्यंत चालणार असून ७ मार्चपासून दहावीच्या परीक्षेला प्रारंभ होणार आहे. दहावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील १५ तालुक्यात १२६ केंद्र ठेवण्यात आले असून ३५ हजार २६ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. शिक्षणाधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार बारावी व पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या दहावीच्या परीक्षेची तयारी पूर्ण झाली आहे. परीक्षा शांततेत पार पडावी यासाठी परीक्षा केंद्रप्रमुख व परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आजही ग्रामीण भागातील अनेक केंद्रांवर कॉपी चालत असल्याचा प्रकार दिसून येते. गतवर्षी अनेक कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांना निलंबीत करण्यात आले होते. बारावीच्या परीक्षेसाठी चंद्रपूर तालुक्यातील सिद्धार्थ विद्यालयाचे परीक्षा केंद्र अतिसंवेदनशिल घोषित करण्यात आले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
सहा भरारी पथके
परीक्षेत गैरप्रकार किंवा इतर कोणताही प्रकार घडू नये, यासाठी सहा भरारी पथक गठित करण्यात आले आहेत. यात शिक्षणाधिकारी माध्यमिक, शिक्षणाधिकारी प्राथमिक, शिक्षाधिकारी निरंतर शिक्षण विभाग, विशेष महिला पथक उपशिक्षाधिकारी माध्यमिक व प्राचार्य डायट यांच्या पथकाचा समावेश आहे.
दहावीचे ३५ हजार विद्यार्थी
७ मार्चपासून सुरू होणाऱ्या दहावीच्या परीक्षेचेही तयारी पूर्ण झाली आहे. १२६ केंद्रावरून ही परीक्षा पार पडणार आहे. यावर्षी ३५ हजार २६ नियमित तथा पुर्नपरीक्षार्थी दहावीची परीक्षा असून ही परीक्षा १ एप्रिलपर्यंत चालणार आहे.
कॉपीबहाद्दरांनो सावधान
बारावीच्या परीक्षेदरम्यान इंग्रजी, गणित, विज्ञान अशा कठीण विषयाच्या पेपरला भरारी पथकांची केंद्रावर नजर असते. कॉपी करताना विद्यार्थी आढळल्यास त्याला निलंबीत केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त परीक्षा पार पाडावी व निलंबीत होण्यापासून स्वत:चा बचाव करावा, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
कलम १४४ लागू
परीक्षा काळात पोलीस विभागाची मदत घेण्यात येत असून परीक्षा केंद्राच्या १०० मीटर अंतर परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. या परिसरात झेरॉक्स सेंटर, मोबाइल तथा अन्य साधने वापरण्यास बंदी आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कलम १४४ लागू राहणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.