३०७ प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर
By Admin | Updated: May 18, 2015 01:21 IST2015-05-18T01:21:40+5:302015-05-18T01:21:40+5:30
चंद्रपूर जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांची वरिष्ठ वेतनश्रेणी अनेक दिवसांपासून प्रलंबित होती.

३०७ प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांची वरिष्ठ वेतनश्रेणी अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. याबाबत महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीने प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. सदर वरिष्ठ वेतनश्रेणी ३०७ शिक्षकांना नुकतीच लागू करण्यात आली. या विषयांवर संघटनेने विधानसभेत तारांकीत प्रश्नही उपस्थित केला होता, हे विशेष.
सन २००२ मध्ये जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षक म्हणून सेवेत रुजू झालेल्या १५० शिक्षकांची वरिष्ठ वेतनश्रेणी प्रलंबित असल्याबाबत संघटनेने प्रश्न उपस्थित केला होता. हाच प्रश्न आमदार शोभाताई फडणवीस यांनी विधानसभेत तारांकीत प्रश्न म्हणून उपस्थित केला. यावर जिल्हा परिषदेची सुनावणी ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे झाली असता एक महिन्याचा अवधी मागून घेण्यात आला. या दरम्यान शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेवून संघटनेचे अन्य पात्र शिक्षकांचाही यादीत समावेश करण्याची मागणी केली. या प्रकरणात एक महिन्याचा अवधी लोटून गेल्यानंतरही प्रस्ताव प्रलंबित असल्यामुळे १२ मे रोजी संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेतली असता त्रुटीसाठी परत गेलेला प्रस्ताव तात्काळ मागवून कारवाई करण्यात आली. (प्रतिनिधी)