चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून कोरोना विषाणूने सर्वत्र दहशत निर्माण केली आहे. जो-तो यावर बोलू लागला आहे. त्यातच रुग्णालयात जागा नाही, औषधोपचार नाही, इंजेक्शन नाही अशा सर्व नकारात्मक गोष्टींचाच पाढा वाचला जात आहे. असे असतानाच यातूनही मार्ग काढत जिल्ह्यात आजपर्यंत तब्बल ३० हजार १०३ नागरिकांनी कोरोनावर मात केली असून ते ठणठणीत बरे झाले आहे. प्रबळ इच्छाशक्ती, योग्यवेळी औषधोपचार, प्रशासनासह आरोग्य विभागाचे प्रयत्न यासोबतच कोरोनाला हरविण्याची जिद्द यामुळेच हे शक्य झाले आहे. त्यामुळे कोरोना नाही तर आपणच भारी, असा विचार करून कोरोना आजारावरही विजय मिळविता येतो, हे या सर्वांनी दाखवून दिले आहे.
मागील वर्षभरापासून कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मार्च २०२१ मध्ये लाॅकडाऊन करण्यात आले. तेव्हापासून आजपर्यंत कोरोनाची दहशत कायम नागरिकांच्या मनात घर करून आहे. मागील वर्षी जिल्ह्यात कोरोनाने धडक दिली. त्यानंतर जिल्हा प्रशासन तसेच आरोग्य प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न करून यावर मात करण्यासाठी ठिकठिकाणी कोरोना चाचणी केंद्र सुरू केले. वर्षभरात ३ लाख २४ हजार ९४५ जणांनी तपासणी करून घेतली. यामध्ये २ लाख ७७ हजार ४२४ नागरिकांना कोरोनाचा साधा स्पर्शसुद्धा झाला नाही. दरम्यान, सोशल डिस्टन्स, मास्क न वापरणे तसेच बेफिकिरीमुळे तसेच चुकून कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ४० हजार ६४७ आहे. यामध्येही ३० हजार १०३ नागरिकांनी कोरोनाला केव्हाच हरविले असून यावरही त्यांनी विजय मिळविला आहे. हा विजय मिळविण्यासाठी त्यांची प्रबळ इच्छाशक्ती हे एकमेव कारण आहे. यासोबतच वेळीच औषधोपचार, डाॅक्टरांचे शर्थीचे प्रयत्न तसेच प्रशासनाने सुचविलेल्या उपाययोजना यासाठी कामी आल्या आहे. त्यामुळे कोरोनाची दहशत नाही तर त्याच्यावर विजय मिळविण्यासाठी प्रत्येकांनी सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझरचा नियमित वापर करावा, राज्य शासन, प्रशासनाने लावून दिलेल्या नियमांचे योग्य पालन करून कोरोनावरही आपल्याला भारी होता येते, हे आता दाखवून दिले पाहिजे.
बाॅक्स
सद्याची स्थिती
एकूण नमुने तपासणी ३२४९४५
एकूण निगेटिव्ह आलेले नमुने २७७४२४
एकूण कोरोना बाधित ४०६४७
एकूण कोरोनामुक्त ३०१०३
ॲक्टिव रुग्ण ९९६९
बाॅक्स
मागील ७ दिवसाचे कोरोनामुक्त रुग्ण
१७.४.२०२१-५४९
१६.४.२०२१-३९२
१५.४.२०२१-३८२
१४.४.२०२१-३३२
१३.४.२०२१-३३५
१२.४.२०२१-३५४
११.४.२०२१-३०५
कोट
कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. ही आधीपेक्षा अधिक वेगाने पसरत आहे. पण अशा परिस्थितीत घाबरून न जाता मन शांत व स्थिर ठेवून कोरोनाचा सामना केला पाहिजे. आपल्या मानसिक स्थितीचा परिणाम रोगप्रतिकार शक्तीवर पडतो. आपण घाबरलो, सतत चिंताग्रस्त राहिलो तर रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे कोरोना झाल्यास मन शांत ठेवून सकारात्मक वृत्तीने डाॅक्टरांच्या सल्याने योग्य ते उपचार केल्यास कोरोनावर मात करू शकतो.
-डाॅ. विवेक बांबोळे
मानसिक आरोग्य तज्ज्ञ, चंद्रपूर
बाॅक्स
वेळीच घ्या दक्षता
कोरोना आजार बरा होतो. यासाठी प्रत्येकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. लक्षण दिसताच वेळीच तपासणी करून घेतली पाहिजे. अंगावर ताप, दुखणे न काढता जवळच्या आरोग्य तपासणी केंद्रात जाऊन कोरोना चाचणी करून घ्या.