२९३ मुख्याध्यापक बनले सहायक शिक्षक
By Admin | Updated: August 5, 2014 23:41 IST2014-08-05T23:41:34+5:302014-08-05T23:41:34+5:30
आरटीई अॅक्टनुसार जिल्ह्यातील ५२८ मुख्याध्यापकांपैकी २३५ मुख्याध्यापकांचे समायोजन यापूर्वीच झाले. मात्र उर्वरित तब्बल २९३ मुख्याध्यापकांना पदवीधर, विशेष तसेच सहायक शिक्षण

२९३ मुख्याध्यापक बनले सहायक शिक्षक
मनस्ताप : तीन टप्प्यात झाले अपात्र समायोजन
चंद्रपूर : आरटीई अॅक्टनुसार जिल्ह्यातील ५२८ मुख्याध्यापकांपैकी २३५ मुख्याध्यापकांचे समायोजन यापूर्वीच झाले. मात्र उर्वरित तब्बल २९३ मुख्याध्यापकांना पदवीधर, विशेष तसेच सहायक शिक्षण म्हणून काम करावे लागत आहे. यामुळे मुख्याध्यापकांमध्ये संतापाचे वातावरण असून अनेकांना नामुष्कीची वेळ आली आहे. काही शिक्षकांना तर ज्या शाळेत पूर्वी मुख्याध्यापक होते त्याच शाळेत सहायक म्हणून काम करावे लागत आहे.
जिल्हा परिषदेंंतर्गंत मुख्याध्यापकांचे समायोजन करण्यात आले. यात प्रथम २३६ शिक्षकांचा समावेश करण्यात आला. यापैकी ८७ मुख्याध्यापकांना ते गावामध्ये कार्यरत होते. त्याच गावात ठेवण्यात आले. ८५ शिक्षकांना त्याच तालुक्यात पण दुसऱ्या गावात बदली करण्यात आली. तर, ६२ शिक्षकांचा तालुका बदल करण्यात आला.
या प्रक्रियेमुळे काही शिक्षकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले असले तरी तालुका बदल झालेल्या शिक्षकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. उर्वरित २९३ मुख्याध्यापकांचे समायोजन तीन टप्प्यात करण्यात आले. या समायोजनामध्ये काही संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी वेळोवेळी शासकीय अध्यादेशाचा आधार घेतला. विशेष म्हणजे, पदवीधर शिक्षण आणि डीएड शिक्षकांचे समायोजन करताना संभ्रम निर्माण झाल्याने त्यांनी शासनाकडून माहिती मागितली. यापूर्वी ज्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून जे शिक्षक काम करत होते. अशा मुख्याध्यापकांना आता विशेष शिक्षक, पदवीधर शिक्षक, सहायक शिक्षक म्हणून काम करण्याची नामुष्की आली आहे. त्यामुळे अध्यापनाच्या कार्यात त्यांचे दुर्लक्ष होतील, असे मत शिक्षक तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
जिल्हा परिषद प्रशासनाने शिक्षकांचे समायोजन करायचे होते तर किमान जुन किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करणे अपेक्षित होते. मात्र आॅगस्ट महिना आला असतानाही समायोजनाची प्रक्रिया सुरु होती. त्यामुळे अनेक शिक्षकांचे नियोजन बिघडले आहे. काही शिक्षकांनी आपल्या पाल्यांना सोयीच्या शाळेत टाकले आहे. त्यामुळे सत्राच्या मधातच आता त्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. (नगर प्रतिनिधी)