२९२ प्रकल्पग्रस्तांना नोकरीवर घेणार
By Admin | Updated: October 8, 2015 00:41 IST2015-10-08T00:41:43+5:302015-10-08T00:41:43+5:30
येत्या ४५ दिवसात पाटाळा, नागलोन, शिवाजीनगर, पळसगाव येथील २९२ प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना नोकरीत सामावून घेण्याचे लेखी आश्वासन वेकोलि ...

२९२ प्रकल्पग्रस्तांना नोकरीवर घेणार
४५ दिवसांचा अवधी : वेकोलि अधिकारी व प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीत निर्णय
भद्रावती : येत्या ४५ दिवसात पाटाळा, नागलोन, शिवाजीनगर, पळसगाव येथील २९२ प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना नोकरीत सामावून घेण्याचे लेखी आश्वासन वेकोलि अधिकाऱ्यांतर्फे संबंधित प्रकल्पग्रस्तांना देण्यात आले. वेकोलि कार्यालय, कुचना येथे प्रकल्पग्रस्त शेतकरी व वेकोलि अधिकारी यांच्यात सोमवारी बैठक पार पडली.
तालुक्यातील पाटाळा, नागलोन, शिवजीनगर, पळसगाव येथील जवळपास १ हजार १०० एकर जमीन वेकोलिद्वारे अधिग्रहण करण्यात आली होती. प्रकल्पग्रस्तांना याबाबतचे धनादेश वाटप करण्यात आले. नोकरीसाठी तीन महिन्यांचे आश्वासन वेकोलितर्फे प्रकल्पग्रस्तांना देण्यात आले. तो कालावधी संपला परंतु नोकऱ्या देण्यात आल्या नाही. त्यानंतर कुठल्या प्रकारची सूचना न देता अधिग्रहण केलेल्या जमिनीवर वेकोलिने काम सुरु केले. भाजपा नेते उमेश बोढेकर यांच्या नेतृत्वात प्रकल्पग्रस्तांनी सदर काम २ आॅक्टोबरला बंद पाडले. नोकरी देणार नसेल तर येत्या ९ आॅक्टोबरपासून आमरण उपोषणाचा इशारा प्रकल्पग्रस्तांनी वेकोलिला दिला.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून ५ आॅक्टोंबरला वेकोलिचे मुख्य व्यवस्थापक आभासिंग यांनी प्रकल्पग्रस्तांसोबत बैठकीचे आयोजन केले.
त्यात येत्या ४५ दिवसात प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना नोकरीत सामावून घेण्याचे लखी आश्वासन वेकोलिचे क्षेत्रीय कार्मिक प्रबंधक बी. आर. शेगावकर यांनी दिले. त्यामुळे येत्या ४५ दिवसांपर्यंत अधिग्रहीत जागेवर काम करण्याची परवानगी, प्रकल्पग्रस्तांद्वारे वेकोलिला देण्यात आली.
या बैठकीला महाप्रबंधक (संचालन) माजरी क्षेत्र आर. कैथ, उपक्षेत्रीय प्रबंधक न्यू माजरी क्षेत्री बी. प्रसाद, क्षेत्रीय योजना अधिकारी माजरी क्षेत्र व्ही. नामदेव, क्षेत्रीय कार्मिक प्रबंधक माजरी क्षेत्री बी. शेगावकर, क्षेत्रीय सुरक्षा प्रभारी माजरी क्षेत्र जे. दुबे तसेच प्रकल्पग्रस्त उमेश बोढेकर, विजय कुमरे, बालाजी डेपाल, विजय धानोरकर, सतीश झाडे, संभाजी गौरकार, दिगांबर खिरटकार, गोकुल डोंगे, सुनील ढवस, विकास ढवस, सतीश ढवस, राजू ढवस, सुनिल खापणे, पांडू आगलावे, पंढरी आगलावे, राजू भुसारी, विलास तिनकर, मंगेश लोणारकर आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)