चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांच्या नेतृत्वात वीजचोरीविरुद्ध कारवाई मोहीम राबविली जात आहे. कोविड १९ सूचनांचे काटेकोरपणे पालन करून सर्व अधीक्षक, कार्यकारी, उपकार्यकारी व सहाययक अभियंता ही कारवाई करीत आहेत. मोहिमेत सहभागी झालेले सर्व अभियंता व कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर व मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले.
वीज कायदा २००३ च्या कलम १३५ अंतर्गत ९२ वीज चोरांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. वीज मीटरमध्ये छेडछाड करण्यात आलेल्या प्रकारांमध्ये नवनवीन फंडे वापरून वीजचोरी केल्याचे उघडकीस आले आहे. विभागात विजेच्या गैरवापराच्या आठ घटना उघडकीस आल्या. त्या ठिकाणी १३३६ वीज युनिट्स बेकायदा वापरल्याने ७१ हजारांचा दंड ठोठावण्यात आला. चंद्र्रपूर मंडळाच्या अधीक्षक अभियंता संध्या चिवंडे व गडचिरोली मंडळाचे अधीक्षक अभियंता गाडगे यांच्या मार्गदर्शनात ब्रह्मपुरी विभागाचे कार्यकारी अभियंता काळे, आलापल्ली विभागाचे कार्यकारी अभियंता मेश्राम, चंद्रपूर विभागाचे कार्यकारी अभियंता फरासखनेवाला, बल्लारपूरचे कार्यकारी अभियंता तेलंग व वरोराचे कार्यकारी अभियंता राठी यांनी उपविभागीय, शाखा अभियंता तसेच जनमित्रांसोबत वीजचोरी पकडण्याची कारवाई केली.