वेकोलिकडून २६३ शेतकऱ्यांची फसवणूक

By Admin | Updated: March 26, 2017 00:36 IST2017-03-26T00:36:55+5:302017-03-26T00:36:55+5:30

वेकोलि व्यवस्थापनाने सिनाळा वाढीव प्रकल्पासाठी चार गावातील २६३ शेतकऱ्यांची ६४२ एकर जमीन अधिग्रहित केली.

263 farmers fraud in Vaikolik | वेकोलिकडून २६३ शेतकऱ्यांची फसवणूक

वेकोलिकडून २६३ शेतकऱ्यांची फसवणूक

६४२ एकर जमीन अधिग्रहित : मोबदल्यासाठी खाण बंदचा इशारा
चंद्रपूर : वेकोलि व्यवस्थापनाने सिनाळा वाढीव प्रकल्पासाठी चार गावातील २६३ शेतकऱ्यांची ६४२ एकर जमीन अधिग्रहित केली. मात्र सहा महिने लोटूनही मोबदला न देता शेतकऱ्यांची फसवणूक केली. सात दिवसात मोबदला न दिल्यास दुर्गापूर खुली खाण बंद करण्याचा इशारा सिनाळा ग्रामपंचायतीच्या सरपंच संगीता मोटघरे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
दुर्गापूर खुल्या खाणीला लागून असलेल्या सिनाळा गावालगत नवीन प्रकल्प वेकोलिच्या वतीने सुरू केला जात आहे.
यासाठी सिनाळा, मसाळा, मसाळा तु. आणि नवेगाव या चार गावातील सुमारे २६३ शेतकऱ्यांची ६४२ एकर जमीन २००८ मध्ये अधिग्रहित केली. २०१० मध्ये सेक्शन ९ लावला.
३ सप्टेंबर २०१६ ला झालेल्या बैठकीत वेकोलिचे मुख्य महाप्रबंधक आभासचंद्र सिंग यांनी पाच महिन्याच्या आत मोबदला दिला जाईल, २७२ लोकांच्या नोकरीची प्रक्रिया एका महिन्यानंतर सुरू केली जाईल. चारही गावांचे पुनर्वसन एकाच वेळेस केले जाईल, शेती मजुरांना कंत्राटी स्वरूपात कामे दिली जातील. उर्वरित घरांचे मूल्यांकन एका महिन्यात करून मोबदला देण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन दिले होते.
मात्र पाच महिने लोटूनही या लेखी आश्वासनावर काहीही झालेले नाही. त्यामुळे जमिनी विकता येत नाही आणि मोबदलाही मिळालेला नाही, अशी शोकांतिका प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची झाली आहे. त्यामुळे सर्व शेतकरी कमालीचे अडचणीत सापडले आहेत.
वेकोलिने सात दिवसात मोबदला न दिल्यास दुर्गापूर खुली खाण बंद करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
पत्रकार परिषदेला ग्रामपंचायत सदस्य अश्विना रामटेके, माया आत्राम, बाबूराव रायपूरे, मंगलदास रामटेके, गंगाधर माऊलीकर, बबन मडावी, श्याम रोहनकर व अनेक प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: 263 farmers fraud in Vaikolik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.