कत्तलीसाठी जाणारी २६ जनावरे पकडली
By Admin | Updated: March 14, 2016 01:02 IST2016-03-14T01:02:45+5:302016-03-14T01:02:45+5:30
कत्तलीसाठी जाणारी २६ जनावरे येथील विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या सतकर्तेमुळे पोलिसांनी पकडली.

कत्तलीसाठी जाणारी २६ जनावरे पकडली
भद्रावती पोलिसांची कारवाई : एकास अटक, तिघे फरार
भद्रावती : कत्तलीसाठी जाणारी २६ जनावरे येथील विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या सतकर्तेमुळे पोलिसांनी पकडली. ही कारवाई रविवारी करण्यात आली.
भद्रावती शहरापासून सहा किमी अंतरावर असलेल्या बोनथाळा शेतशिवारातून कत्तलीसाठी जनावरे नेण्याची तयारी सुरू असल्याची माहिती बजरंग दल व विहिंपच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यांनी लगेच सकाळी ११ ते दुपारी १२ वाजताच्या दरम्यान घटनास्थळाकडे धाव घेतली असता, तेथे त्यांना २६ गुरे आढळून आली.
याबाबत विचारणा केली असता, गुरांसोबत असलेल्या चार इसमांनी ही गुरे कत्तलीसाठी चालल्याचे सांगितले. यात २५ बैल व एका गाईचा समावेश होता. यापैकी तीन बैल अत्यंत जखमी अवस्थेत होते. कार्यकर्त्यांनी लगेच भ्रमणध्वनी वरुन भद्रावती पोलिसांना माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक धोकटे हे दोन पोलीसासह घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी ‘त्या’चार इसमापैकी एकाला ताब्यात घेतले व जनावरे गोशाळेत घेऊन चलायला सांगितले. या दरम्यान तीन आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले.
पकडलेली जनावरे येथील जैन मंदिराच्या गोशाळेत दाखल करण्यात आली असून आरोपी शेख अब्बू शेख अहमद (४६) रा. भंगाराम वार्ड भद्रावती यास अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (शहर प्रतिनिधी)