गोंडवानातील २५ हजार विद्यार्थिनींना मिळणार आत्मबळाचा पाठ
By Admin | Updated: February 22, 2015 01:00 IST2015-02-22T01:00:48+5:302015-02-22T01:00:48+5:30
गोंडवाना विद्यापीठातील २५ हजार विद्यार्थीनींना आत्मबळासोबतच सक्षमिकरण आणि स्वसंरक्षणाचे पाठ मिळणार आहेत. भारतीय जैन संघटनेच्या सहकार्याने गोंडवाना विद्यापीठाने हा उपक्रम हाती घेतला आहे.

गोंडवानातील २५ हजार विद्यार्थिनींना मिळणार आत्मबळाचा पाठ
चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठातील २५ हजार विद्यार्थीनींना आत्मबळासोबतच सक्षमिकरण आणि स्वसंरक्षणाचे पाठ मिळणार आहेत. भारतीय जैन संघटनेच्या सहकार्याने गोंडवाना विद्यापीठाने हा उपक्रम हाती घेतला आहे. विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातील निवडक १०० प्राध्यापक आणि विद्यार्थीनींचे ‘टे्रनर्स’ म्हणून तीन दिवसांचे प्रशिक्षणही पार पडले आहे.
भारतीय जैन सेवा समितीचे संघटक शांतीलाल मुथा यांच्या संकल्पनेतून १० वर्षांपूर्वी सुरू झालेला हा उपक्रम यावेळी प्रथमच जैनेत्तर विद्यार्थीनींसाठी गोंडवाना विद्यापीठात राबविला जात आहे. गोंडवाना विद्यापीठात येणाऱ्या २३६ महाविद्यालयांतील सर्वच म्हणजे सुमारे २५ हजार विद्यार्थीनींना या प्रशिक्षणाचा लाभ मिळणार आहे.
या उपक्रमांतर्गत १०० टे्रनर्सचे ‘मास्टर टे्रनिंग प्रोग्राम फॉर प्रिपेरिंग ट्रेनर्स’ हे प्रशिक्षण १८ फेब्रुवारीपासून चंद्रपुरातील सरदार पटेल महाविद्यालय आणि एफ.ई.एस. महाविद्यालयात सुरू झाले. त्याचा समारोप शनिवारी पार पडला. या निमीत्त झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय जैन संघटना आणि गोंडवाना विद्यापीठाने हा मानस व्यक्त केला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित, जैन संघटनेने राष्ट्रीय सचिव संजय सिंघवी, सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे.ए. शेख, अॅड. विजय मोगरे, अशोक सिंघवी, रोहित पुगलिया आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
दिल्लीतील निर्भया घटनेच्या पार्श्वभूमीवर तरूणींना सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्यात जाणिव जागृती निर्माण करण्यासाठी भारतीय जैन संघटना आणि गोंडवाना विद्यापीठाने अलिकडेच एक करार केला आहे. त्या नुसार विद्यापीठातील सर्वच तरूणींना प्रशिक्षण देण्याचे ठरले आहे. या प्रशिक्षणासाठी साहित्यवाटप आणि तज्ज्ञ प्रशिक्षक उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जैन संघटनेने घेतली असून प्रशिक्षणार्थी आणि स्थळ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांनी घेतली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)