२४३ उमेदवार उतरले रिंगणात
By Admin | Updated: July 29, 2015 00:55 IST2015-07-29T00:55:03+5:302015-07-29T00:55:03+5:30
बल्लारपूर तालुक्यात एकूण १७ पैकी १० ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका येत्या ४ आॅगस्टला होत आहेत.

२४३ उमेदवार उतरले रिंगणात
बल्लारपूर तालुका : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी विसापुरात सर्वाधिक ६३ उमेदवार
बल्लारपूर: बल्लारपूर तालुक्यात एकूण १७ पैकी १० ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका येत्या ४ आॅगस्टला होत आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर व निवडणूक चिन्हांचे वाटप होताच ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापायला लागले आहे. या निवडणुकीत एकूण ८६ जागांसाठी २४३ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये विसापूर ग्रामपंचायतीत एकूण १७ जागांसाठी ६३ उमेदवारांनी दंड थोपटले आहेत. यासाठी तालुक्यात एकूण २२ हजार १९ मतदार पसंतीच्या उमेदवारांची निवड करणार आहे.
विसापूर ग्रामपंचायतीच्या प्रभाग एकमध्ये तीन जागांसाठी एकूण ११ उमेदवार भाग्य आजमावित आहेत. प्रभाग दोनमध्ये काँग्रेस व भाजपाच्या उमेदवारांत सरळ लढत होत असून दोन जागांसाठी चौघे मतदानाचा जोगवा मागत आहेत. प्रभाग तीनमध्ये तीन जागांसाठी ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. प्रभाग चारमध्ये तीन जागांवर १२ उमेदवारांनी दावा केला आहे. येथील प्रभाग पाचमध्ये तीन जागांसाठी १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, प्रभाग सहाच्या तीन जागेवर आठ उमेदवार एकमेकांना आव्हान देत आहेत. येथे काँग्रेस प्रणित आघाडीने भाजपाच्या उमेदवारांपुढे आव्हान उभे केले आहे.
नांदगाव (पोडे) ग्रामपंचायतीच्या ११ जागांसाठी एकूण २७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. येथे प्रभाग एकमध्ये तीन जागांसाठी सहा, प्रभाग दोनमध्ये दोन जागांसाठी सात, प्रभाग तीनमध्ये तीन जागांवर सहा तर प्रभाग चारमध्ये तीन जागांवर सात उमेदवार निवडणुकीला सामोरे जात आहेत. येथे काँग्रेस प्रणित आघाडीचे गोविंदा पोडे व भाजपा प्रणित आघाडीचे मनोहर देऊळकर यांच्यात दुहेरी लढत होत आहे. हडस्ती ग्रामपंचायतीअंतर्गत प्रभाग दोनमध्ये मंगेश दशरथ धोबे व शंकुतला बंडू ढोबे हे उमेदवार अविरोध निवडून आलेत. या ग्रामपंचायतीच्या प्रभाग एकमध्ये दोन जागांवर सहा तर प्रभाग तीनमध्ये तीन जागांवर सहा उमेदवारांनी एकमेकांना आव्हान देण्याचा प्रयत्न चालविला आहे. येथे दोन आघाड्यात रस्सीखेची सुरू झाली आहे. कळमना ग्रामपंचायतीमध्ये सुनिता रविंद्र उरकुडे या अविरोध निवडून आल्या. येथे आठ जागांसाठी १८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकूण तीन प्रभागात येथे निवडणूक होत आहे. काँग्रेस व भाजपा प्रणित आघाडीच्या उमेदवारांत सरळ लढत होत आहे.
आमडी ग्रामपंचायतीत तीन प्रभागातील सात जागांवर २०, कोर्टीमक्ता येथे चंदा भाऊराव सोयाम अविरोध विजयी झाल्या. येथे एकूण सहा जागांवर १३ उमेदवारांनी दावा ठोकला आहे. पळसगाव ग्रामपंचायतीच्या ९ जागेसाठी २० उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरुन मतांचा जोगवा मागण्यास सुरुवात केली आहे. मानोरा येथे नऊ जागांवर तीन प्रभागातून २६ उमेदवार निवडणुकीसाठी रिंगणात उतरले आहेत. किन्ही येथे सात जागांवर १८ उमेदवार भाग्याचा फैसला करण्यासाठी दारोदार भटकंती करीत असून मतदारांना आर्जव करीत आहेत. गिलबिली ग्रामपंचायतीत सात जागांवर २६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मानोरा, किन्ही व गिलबिली ग्रामपंचायतीत तिरंगी लढतीचे चित्र आहे. (शहर प्रतिनिधी)
४० मतदान केंद्रावर होणार मतदान
बल्लारपूर तालुक्यात १० ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक होत असून यासाठी विसापूर, नांदगाव (पोडे) व हडस्ती ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रशांत चिचघरे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनिल निवलकर, पळसगाव, मानोरा, किन्ही व गिलबिली ग्रामपंचायतीसाठी जितेंद्र चवरे व किशोर डाखोरे यांची तर कळमना, आमडी व कोर्टिमक्ता ग्रामपंचायतीसाठी डी.एम. गौरकार व सुनिल वनकर यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विसापूर १२, नांदगाव (पोडे) चार, हडस्ती तीन, आमडी तीन, कळमना तीन, कोर्टीमक्ता तीन, पळसगाव तीन, मानोरा तीन, किन्ही तीन व गिलबिली तीन असे एकूण ४० मतदान केंद्र ठरविण्यात आले.