२२४ अंगणवाड्या होणार ‘स्मार्ट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 22:48 IST2019-06-03T22:48:32+5:302019-06-03T22:48:49+5:30
केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाद्वारे आयसीडीएस प्रणाली अंतर्गत राष्ट्रीय पोषण मिशनच्या माध्यमातून आयसीडीसी-कॅश (कॉमन अप्लिकेशन सॉफ्टवेअर) विकसित करण्यात आले. त्यासाठी जिल्हा परिषद व बालकल्याण विभागाच्या वतीने अंगणवाडी सेविकांना इंटरनेट सेवेसह स्मार्टफोन देण्यात आले. तालुक्यातील २२४ अंगणवाड्यांमध्ये ही प्रणाली अचुकपणे वापरल्या जात आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयाच्या मार्गदर्शनामुळे कामकाज ‘स्मार्ट’च्या मार्गावर आहे.

२२४ अंगणवाड्या होणार ‘स्मार्ट’
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाद्वारे आयसीडीएस प्रणाली अंतर्गत राष्ट्रीय पोषण मिशनच्या माध्यमातून आयसीडीसी-कॅश (कॉमन अप्लिकेशन सॉफ्टवेअर) विकसित करण्यात आले. त्यासाठी जिल्हा परिषद व बालकल्याण विभागाच्या वतीने अंगणवाडी सेविकांना इंटरनेट सेवेसह स्मार्टफोन देण्यात आले. तालुक्यातील २२४ अंगणवाड्यांमध्ये ही प्रणाली अचुकपणे वापरल्या जात आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयाच्या मार्गदर्शनामुळे कामकाज ‘स्मार्ट’च्या मार्गावर आहे.
तालुक्यात २२४ अंगणवाडी केंद्र आहेत. सर्व अंगणवाडी सेविकांना इंटरनेट सेवेसह स्मार्ट फोन देण्यात आले आहे. शिवाय दर तीन महिन्याकरिता नेट रिचार्जसाठी प्रत्येक अंगणवाडी सेविकेला ४०० रूपये दिल्या जाते. चार टप्प्यात प्रशिक्षण देण्यात येणार असून पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी डॉ. कुणाल धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविकांना मोबाईल प्रशिक्षण देत आहेत. मोबाईलमधील कॅश अप्लिकेशनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील बालकांच्या दैनंदिन नोंदी,लसीकरण, गृहभेटी, स्तनदा माता, गरोदर माता व किशोरी मुलींच्या आरोग्याच्या नोंदी, पोषण आहाराचे वाटप, दैनंदिन अहवाल, उंचीच्या नोंदी व अहवाल तयार केले जात आहे. अंगणवाडी केंद्राच्या प्रत्येक लाभार्थ्यांची आॅनलाईन नोंद करणे, रियल टाइम डेटाचा उपयोग करताना रिपोर्ट व डॅशबोर्ड प्रदान करणे, आदी कामे आॅनलाईन केली जात आहेत.
११ रजिस्टर झाले कालबाह्य
याआधी अंगणवाडी सेविकांना वेगवेगळ्या ११ रजिस्टरमध्ये माहिती लिहून प्रकल्प स्तरावर सादर करावे लागत होते. सदर काम वेळखाऊ व जिकरीचे होते. आता मोबाईलद्वारे पोषण आहार स्थिती, कुटुंब व्यवस्थापन, दैनिक आहार, गृहभेट नियोजन, वाढ देखरेख, शिधा वाटप नोंद, अंगणवाडी केंद्र व्यवस्थापन, मासिक प्रगती अहवाल कॅश अप्लिकेशनद्वारे आॅनलाईन भरल्या जात आहे, अशी माहिती अंगणवाडी पर्यवेक्षिका वसुंधरा मेश्राम यांनी दिली.