तालुक्यातील २१ वर्गखोल्या धोकादायक
By Admin | Updated: July 17, 2017 00:40 IST2017-07-17T00:40:13+5:302017-07-17T00:40:13+5:30
नागभीड तालुक्यातील जि.प. च्या १६ शाळांमधील २१ वर्गखोल्यांची स्थिती अतिशय धोकादायक असून या वर्गखोल्या

तालुक्यातील २१ वर्गखोल्या धोकादायक
उपाययोजनेची गरज : गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या अहवालानंतरही कार्यवाही नाही
घनश्याम नवघडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : नागभीड तालुक्यातील जि.प. च्या १६ शाळांमधील २१ वर्गखोल्यांची स्थिती अतिशय धोकादायक असून या वर्गखोल्या विद्यार्थ्यांना बसण्यायोग्य राहिल्या नाहीत, अशी खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे.
एकीकडे शासन स्तरावर संपूर्ण शाळा डिजीटल करण्याची मोहीम सुरू असून त्याचवेळी या शाळा मोडकळीस निघाल्या आहेत. या शाळा अद्यावत करून द्या किंवा नवीन वर्गखोल्या उपलब्ध करून द्या, अशी स्थानिक शाळा व्यवस्थापन समिती किंवा ग्रामपंचायतीकडून मागणी होत असली तरी या मागणीकडे लक्ष द्यायला प्रशासनाला वेळ नाही, हेच यावरुन सिद्ध होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जि.प. शाळा भिकेश्वर, जि.प. शाळा धामनगाव (चक), जि.प. शाळा विलम, जि.प. शाळा म्हसली, जि.प. शाळा पाहार्णी, जि.प. शाळा किटाळी, जि.प. शाळा चारगाव (माल), जि.प. उच्च प्राथमिक शाळा नागभीड, जि.प. प्राथमिक शाळा (मुलांची) तळोधी, जि.प. प्राथमिक शाळा (मुलींची) तळोधी, जि.प. प्राथमिक शाळा बाळापूर (बुज), आणि जि.प. प्राथमिक शाळा कोटेगाव या शाळामधील प्रत्येक एक वर्गखोली मोडकडीस आली आहे.
जि.प. प्राथमिक शाळेच्या ३ वर्गखोल्या धोकादायक आहेत. जि.प. शाळा मेंढा, जि.प. शाळा मिंथूर आणि जि.प. शाळा बाम्हणी येथील प्रत्येकी २ वर्गखोल्या धोकादायक असल्याची माहिती आहे. येथील शिक्षण विभागाने वरिष्ठांना या संदर्भात माहिती दिल्याचे कळते. इमारत धोकादायक असून विद्यार्थ्यांना बसायला जागा नाही, असा शेरासुद्धा येथील गटशिक्षणाधिकारी यांनी वरिष्ठांना दिलेल्या माहितीत दिला आहे. अनुचित घटना घडण्यापूर्वीच यावर उपाययोजना गरजेची आहे.