६०४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत २,०९५ महिलांचा विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:29 IST2021-01-19T04:29:58+5:302021-01-19T04:29:58+5:30
चंद्रपूर : महिलांना राजकीय क्षेत्रात प्रतिनिधित्व करण्यासाठी ५० टक्के आरक्षणाची तरतूद झाली. या तरतुदीमुळे ग्रामपंचायतमधील राजकारणाचे पारंपरिक चित्र बदलले. ...

६०४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत २,०९५ महिलांचा विजय
चंद्रपूर : महिलांना राजकीय क्षेत्रात प्रतिनिधित्व करण्यासाठी ५० टक्के आरक्षणाची तरतूद झाली. या तरतुदीमुळे ग्रामपंचायतमधील राजकारणाचे पारंपरिक चित्र बदलले. जिल्ह्यातील ६०४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत २,०९५ महिला विजयी झाल्या. यातील बहुतांश महिला सदस्यांनाच पहिल्यांदाच प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.
महिलांमध्येही सार्वजनिक क्षेत्रात सहभागी होऊन नेतृत्व करण्याची क्षमता असते. कुटुंब व्यवस्थेतील अर्थकारण व सामाजिकीकरणाचे काटेकोरपणे पालन करणाऱ्या महिलांचे ज्ञान, अनुभव गावाच्या विकासासाठी उपयुक्त ठरू शकतात. परंतु, संधी मिळत नसल्याने त्यांचा नाईलाज असतो. हाच उद्देश समोर ठेवून महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण देण्यात आले. २४ एप्रिल १९९३ पासून स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेत महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय लागू झाला. जिल्ह्यातील ६०४ ग्रामपंचायतींमधील ४,१९१ जागांसाठी निवडणूक झाली. यामध्ये ५० टक्के आरक्षण तरतुदीनुसार २,०९५ महिला विजयी झाल्या आहेत.
कुटुंबाचे पाठबळ असेल तर शक्य
महिलांनी थेट राजकारणात सहभाग घेतल्यास ग्रामीण भागातील पारंपरिक राजकीय नेत्यांकडून आडकाठी आणल्या जाते. नामांकन अर्ज दाखल करण्यापासूनच असे प्रकार घडतात. चिमूर, गोंडपिपरी, मूल, भद्रावती व राजुरा तालुक्यात अशा घटना घडल्या. मात्र, राजकारणात प्रथमच पाऊल टाकणाऱ्या महिलांना कुटुंबाकडून भक्कम पाठबळ मिळाले. त्यामुळे त्या निवडून येऊ शकल्या.