पिलांच्या शोधात २०० वनकर्मचारी तैनात
By Admin | Updated: September 12, 2016 00:41 IST2016-09-12T00:41:09+5:302016-09-12T00:41:09+5:30
मृतावस्थेत आढळलेल्या वाघिणीच्या पिलांचा शोध घेण्यासाठी वनविभागाने २०० कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात केला आहे.

पिलांच्या शोधात २०० वनकर्मचारी तैनात
अद्याप शोध नाही : वाघिणीच्या मृत्यूूनंतर परिस्थिती
नागभीड/तळोधी (बा.) : मृतावस्थेत आढळलेल्या वाघिणीच्या पिलांचा शोध घेण्यासाठी वनविभागाने २०० कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात केला आहे. असे असले या फौजफाट्याला या पिलांचा अद्यापही शोध घेता आला नाही, हे वन विभाग कितीही नाकारत असले तरी हे सत्य आहे.
३ सप्टेंबरच्या संध्याकाळी मिंडाळा कक्ष क्र. ७३ अंतर्गत सावंगी जंगलात वाघीण मृतावस्थेत आढळली. एप्रिल महिन्यात वाघाचे तीन पिल्ले त्याच परिसरात अगदी उघड्यावर खेळताना अनेकांनी पाहिले होते. एवढेच नाही तर त्या बछड्यांची आई त्या बछड्यांजवळ येईपर्यंत वन विभागाने त्यांना संरक्षणही दिले होते. आता त्याच परिसरात वाघीण मृतावस्थेत आढळली. त्यावरून ती वाघीण त्या पिल्लांचीच आई असावी, यावर सर्वांचेच एकमत आहे. ती पिल्ले अद्यापही कोणाच्या दृष्टीपथास पडले नाहीत. म्हणूनच वन विभागाने त्यांचा शोध घेण्यासाठी वन विकास महामंडळ आणि वन विभाग या दोन्ही विभागाकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यासाठी दोन्ही विभागाचे मिळून वनपरिक्षेत्र अधिकारी दर्जाचे १५ अधिकारी, क्षेत्र सहायक दर्जाचे ५० अधिकारी, ५० वनरक्षक आणि ६० ते ७० वनमजूर तैनात करण्यात आल्याची माहिती आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून हे पथक या पिल्लांचा शोध घेत आहेत. त्यापैकी कोणतेही पिलू अद्यापही अधिकाऱ्याच्या दृष्टीस पडले नाही, हे निर्विवाद सत्य आहे. जर ही पिल्ले दिसली असती तर वन विभागाने या त्यांना ताब्यात घेऊन शोधमोहीम थांबविली असती, असे अनेकांचे म्हणणे आहे. (लोकमत चमू)
पिल्ले दिसल्याचा दावा
वन विभाग गेल्या चार-पाच दिवसांपासून वाघिणीपासून विभक्त झालेल्या या पिलांंचा शोध २०० कर्मचारी त्यांचा शोध घेत असले तरी त्यांचा माग लागलेला नाही. त्यामुळे ही पिल्ले गेली कोठे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शोध घेणाऱ्या एका वनरक्षकाला व वनमजुराला ही पिल्ले दिसली. पण ते लगेच झुडुपाआड गेल्याने शहानिशा करू शकले नाहीत.
नीलजई परिसरात वाघ
घुग्घुस : वेकोलिच्या नीलजई कोळसा खाण परिसरातील नीलजई-तरोडा गाव परिसरात शनिवारी वाघाने एका रोहीची शिकार केली. त्यामुळे वाघाचे वास्तव्य असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. त्या परिसरातून वेकोली कामगाराचे रात्रंदिवस रहदारी असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाकडून पिंजरा ठेवण्याची कारवाई सुरू असल्याचे कळते.