वरोऱ्यात चार महिन्यात २० लाखांची दारू जप्त
By Admin | Updated: August 1, 2015 01:03 IST2015-08-01T01:03:58+5:302015-08-01T01:03:58+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीला चार महिन्यांचा कालावधी होत आहे. या कालावधीमध्ये वरोरा पोलिसांनी २० लाख रुपयांची देशी विदेशी दारू जप्त करीत १९० गुन्हे दाखल केले असून दोनशे आरोपींना अटक केली.

वरोऱ्यात चार महिन्यात २० लाखांची दारू जप्त
वरोरा : चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीला चार महिन्यांचा कालावधी होत आहे. या कालावधीमध्ये वरोरा पोलिसांनी २० लाख रुपयांची देशी विदेशी दारू जप्त करीत १९० गुन्हे दाखल केले असून दोनशे आरोपींना अटक केली.
वरोरा पोलिस स्टेशन हद्दीला यवतमाळ व वर्धा जिल्हा लागून आहे. नागपूर जिल्ह्याचे अंतरही कमी असल्याने वरोरा तालुक्यात चंद्रपूर जिल्ह्यात दारू बंदी झाल्यानंतर यवतमाळ नागपूर- मार्गे सर्वाधीक दारू येणार असल्याने वरोरा पोलिस दारूबंदीच्या प्रारंभापासूनच अधिक सर्तक होते. चार महिन्यात वरोरा पोलिसांनी वीस लाख रुपये किंमतीपेक्षा अधिकची देशी विदेशी दारू जप्त केली आहे. १९० गुन्हे दाखल करण्यात आले असून आज पावेतो २०० व्यक्तींना अटक केली आहे. चार चाकी ११ वाहन, दुचाकी १८ वाहने, दोन आॅटो व रुग्णवाहिकाही अवैध दारू प्रकरणात जप्त केली आहे. वरोरा पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये स्थानिकासह चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर तसेच मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातील व्यक्तींचा समावेश आहे. या कारवाईमुळे दारू तस्करांना आपले पाळमुळे खोल रुजवीता आले नसल्याचे दिसून येत आहे. वरोरा पोलिसांच्या लक्षणीय कामगिरीमुळे तूर्तास दारु तस्करांचे धाबे दणाणले असल्याचे तालुक्यात दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)
दारू तस्कराचा नवीन फंडा
जिल्ह्यात दारू बंदी झाल्यानंतर दारू पकडण्यास पोलीस चौकशी करीत खरेदी केलेल्या दारू दुकानात पोहचत असल्याने दारू दुकानदारांचे धाबे दणाणले होते. यामध्ये अवैध दारू विक्रेते दुकानातून थेट दारू घेत होते. आता अवैध दारू विक्रेत्यांनी थेट दारू दुकानातून दारू घेणे टाळणे सुरू केले आहे. अपरिचीत व्यक्ती अज्ञान स्थळी दारू सोडून जातो, त्या जागेवरुन अवैध दारू विक्रेते दारू घेऊन येतात. त्यामुळे अवैध दारू विक्रेते सापडल्यावरही तूर्तास दारू दुकानदारापर्यंत पोलिसाना पोहचणे कठीण झाले आहे.