दोन महिन्यांत २० मृत्यू

By Admin | Updated: December 4, 2015 01:18 IST2015-12-04T01:18:23+5:302015-12-04T01:18:23+5:30

राजुरा तालुक्यातील राज्याच्या शेवटच्या टोकावरील लक्कडकोट, घोट्टा, कोष्टाळा व गुड्यातील शेकडो रुग्ण दोन-तीन महिन्यांपासून डेंग्यू, ...

20 deaths in two months | दोन महिन्यांत २० मृत्यू

दोन महिन्यांत २० मृत्यू

राजुरा : राजुरा तालुक्यातील राज्याच्या शेवटच्या टोकावरील लक्कडकोट, घोट्टा, कोष्टाळा व गुड्यातील शेकडो रुग्ण दोन-तीन महिन्यांपासून डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया, मेंदूज्वर अशा विविध प्रकारच्या आजाराची लागण झाल्याने त्रस्त झाले आहेत. शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्राचा उपचार फक्त ‘रेफर’ व मलेरियाच्या गोळ्या यापर्यंत मर्यादित असल्यामुळे येथील सुमारे २० लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर भयभित झालेल्या शेकडो रुग्णांनी खासगी रुग्णालयात दाखल होऊन उपचार सुरू केल्याची माहिती आहे.
देवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात लक्कडकोट, घोट्टा, कोष्टाळा ही गावे व गुडे येतात. येथे एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत असल्यामुळे भेट देऊन उपचार करणे अवघड होते. माहे आॅगस्टपासून या गावातील लोकांना मलेरिया, डेग्यू, चिकनगुनिया, मेंदूज्वर आदी आजाराची लागण होणे सुरु झाले. रुग्णास आरोग्य केंद्रातून योग्य उपचार मिळत नव्हता. हा परिसर आदिवासी व दुर्बल घटकाचा आहे. नापिकीमुळे हतबल झालेले शेतकरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे. त्यामुळे शासकीय आरोग्य सेवा हीच त्याच्यासाठी मृत्यूपासून बचाव करण्याचे एकमात्र साधन आहे. परंतु तिच सेवा कोलमडल्यामुळे या परिसरातील सुमारे २० रुग्णांना विविध आजाराने दोन महिन्याच्या कालावधीत जीव गमवावा लागला. यातील काही रुग्णांचा मृत्यू रस्त्यात झाला तर काहींचा रुग्णालयात व घरी झाला आहे.मृत पावलेल्यांमध्ये राजीव मोंडी ओडरे, विठ्ठल भीमराव सेरकुरे, लिंगू मारु मेश्राम, भिमराव पुजारी, पार्वताबाई अर्जुन बंडी, लक्ष्मय्या किमय्या पोरका, शांताबाई पुलय्या बोगना, रमेश बापू कुंदरप्पा, सदाशिव जाणू आदे, येलय्या रामलू तोगर, कल्पना हनमंतु गंगुला, ब्रम्हराज मुत्ताबाई मारोती पाल, गंगाराम नानाजी मुडे, जलमुबाई महादू जुमनाके, गंगय्या नागेद्र आलेटी, कुळसंगे, व पिंपळगाव येथील मुलगा, मुलगी, यांचा सप्टेंबर महिन्यापासून नोव्हेंबरपर्यंतच्या कालावधीत मृत्यू झाला आहे. तसेच शेकडो रुग्णांनी ग्रामीण रुग्णालय राजुरा, आशाधाम विरुर व खाजगी रुग्णालय राजुरा, चंद्रपूर येथे उपचार करुन मृत्यूच्या खाईतून बचाव केला आहे.शासनाकडून विविध प्रकाराच्या आजारावर उपचाराचा गवगवा केला जातो. परंतु देवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णाचा आजार पाहून आजारी पडले होते. याबाबत सदर प्रतिनिधीने वेळोवेळी जिल्हा आरोग्य अधिकारी, उपजिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी राजुरा यांना मोबाईलद्वारे शेकडो रुग्ण घरोघरी तापाणे फणफणत असल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या परिसरात फेरफटका मारुन थातूरमातूर उपचार करुन रेफर अनेकांना रेफर केले. बरेच रुग्ण खासगी उपचार घेत होते. मृत्यूपासून बचाव करण्यासाठी बऱ्याच लोकांनी उसनवारी घेऊन खाजगी उपचार केला व ज्यांच्याकडे काहीच नव्हते, त्यांचा उपचाराअभावी मृत्यू झाला, ही वास्तविकता आहे.
चिकन गुनियाच्या आजराने ग्रस्त असलेले रुग्ण आजही पूर्णपणे तंदुरुस्त झाले नाही. बऱ्याच रुग्णास उठणे बसणे त्रासदायक आहे. देवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात एकच वैद्यकीय असल्यामुळे तेदेखील गांभीर्याने कर्तव्य पार पाडत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे शासकीय आरोग्य सेवेवरील जनतेचा विश्वास उडाला आहे. येथील जनता मृत्यूपासून बचाव करावयाचा असल्याने खाजगी रुग्णालयाचा आधार घेताना दिसत आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: 20 deaths in two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.