चंद्रपूरच्या विकास कामांसाठी २० कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2016 02:18 IST2016-11-03T02:18:48+5:302016-11-03T02:18:48+5:30
राज्याचे वित्त आणि नियोजन, वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने

चंद्रपूरच्या विकास कामांसाठी २० कोटींचा निधी
वित्तमंत्र्यांचा पुढाकार : नगर विकास विभागाची मंजुरी
चंद्रपूर : राज्याचे वित्त आणि नियोजन, वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकासकामांसाठी २० कोटी १२ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाच्या १५ आॅक्टोबर च्या पत्रानुसार नगर परिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान या शिर्षांतर्गत सदर निधी मंजूर करण्यात आला आहे.
चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील बाबुपेठ परिसरात स्टेडियम उभारले जाणार असून यासाठी दोन कोटी ८० लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. ऐके काळचा कोणेरी तलाव असलेला आणि आताचे कोहीनूर स्टेडियमच्या नूतनीकरणाचे काम महानगर पालिकेने प्रस्तावित केले होते. यासाठी ६० लाखांचा निधी मिळणार आहे.
प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहाची दुरूस्ती व नुतनीकरणाचे काम सुरू आहे. येत्या तीन महिन्यात हे काम पूर्णत्वास येणार असून यासाठी सहा कोटी १९ लाख ८९ हजार रूपये मंजूर झाले आहेत. चौक आणि सार्वजनिक भुखंडांचाही विकास होणार आहे. नागपूर रोडवरील डॉ. धांडे यांच्या घरासमोरील खुल्या जागेच्या विकासासाठी ४० लाख मिळणार आहेत. तर, बस स्थानक ते सावरकर चौकापर्यंतच्या रस्ता विकसित करण्यासाठी चार कोटी आठ लाख रूपये मिळणार आहेत. वाहतूक नियंत्रण कार्यालयाजवळील चौक विकसित करण्यासाठी एक कोटी ७५ लाख रूपये मिळत आहेत. प्रोफेसर कॉलनीतील खुल्या जागेला संरक्षक भिंत आणि सामाजिक सभागृहाच्या बांधकामासाठी ३३ लाख ९० हजार रूपये मिळत आहेत.
उर्जाबचत व नवीन आधुनिक पद्धतीचे पथदिवे शहरात उभारले जाणार आहेत. इरई नदी ते वडगावपर्यंतच्या या कामासाठी ८१ लाख ७१ हजार रूपयांचा तर, जयका आॅटो कंपनीपासून भागवत आर्केडपर्यंतच्या कामासाठी ५९ लाख ४८ हजार रूपये मिळणार आहेत. पोलिसांसाठी दीड कोटी रूपये खर्चून अत्याधुनिक जिम बांधले जाणार आहे. रय्यतवारी प्रभागमध्ये ४१ लाख तीन हजार रूपये खर्चून कॉंक्रीट रोड बांधला जाणार आहे. वडगाव प्रभागात काँक्रीट मार्ग विकसित करण्यासाठी ५१ लाख नऊ हजार रूपये मंजूर झाले आहेत. असा २० कोटी १२ लाख रूपयांचा निधी चंद्रपुरातील विकासकामांसाठी मिळणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)