१८ शिक्षक पुरस्काराने सन्मानित
By Admin | Updated: September 6, 2016 00:34 IST2016-09-06T00:34:56+5:302016-09-06T00:34:56+5:30
जिल्हा परिषदेकडून दरवर्षी जिल्हा शिक्षक पुरस्कार देऊन शिक्षकांचा गौरव केला जाते.

१८ शिक्षक पुरस्काराने सन्मानित
हंसराज अहीर यांचे प्रतिपादन : पुरस्कार हा प्रेरणा देणारा ठरावा
चंद्रपूर : जिल्हा परिषदेकडून दरवर्षी जिल्हा शिक्षक पुरस्कार देऊन शिक्षकांचा गौरव केला जाते. सत्कार हा त्यांना व इतर शिक्षकांसाठी प्रेरणा देणारा ठरावा; जिल्ह्यात शिक्षकांचे कार्य चांगले असून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या मा. सा. कन्नमवार सभागृहात सोमवारी आयोजित जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला आ. नाना श्यामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरूनुले, उपाध्यक्ष कल्पना बोरकर, शिक्षण सभापती देवराव भोंगळे, महिला व बालकल्याण सभापती सरिता कुडे, जि. प. सदस्य ब्रिजभुषण पाझारे, अविनाश जाधव, सुभाष कासनगोट्टूवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे, शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर, राम गारकर आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषद शिक्षण विभागाने नवनवीन उपक्रम राबवून गुणवत्ता विकासात भर पाडली आहे. या नवोपक्रमाच्या माध्यमातून शिक्षकांनी नवचेतना घेतली असून डिजीटल शाळांच्या माध्यमातून गुणवत्तेत आणखी भर पडेल. यासाठी जिल्हा परिषदेचा पुढाकार राहील, असे संध्या गुरूनुले यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमात प्राथमिक गटातून घनोटी नं. १ जि. प. शाळेचे सुधाकर कन्नाके, खेडी शाळेच्या मंगला गोंगले, गेडामगुडा शाळेचे लहू नवले, ब्रह्मपुरीचे रतिराम चौधरी, सिंदूर शाळेचे नागेश सुखदेवे, लिखीतवाडा शाळेचे राजेश्वर अम्मावार, बोथली शाळेचे भीमराव ठवरे, शेडेगाव शाळेचे प्रकाश कोडापे, नंदोरी बु. शाळेचे प्रेमानंद नगराळे, इटोली शाळेच्या मीना गादम, कळमगाव शाळेचे अजय बोंडे, खडकी शाळेचे शंकर तलांडे, मेसा शाळेच्या सीमा राऊत, विहिरगाव शाळेचे बंडू मडावी, चांदापूर शाळेचे सुरेश टिकले यांचा तर माध्यमिक गटातून ब्रह्मपुरी जि.प. हायस्कूलचे अनिल वाळके, जि. प. हायस्कूल राजुराच्या रत्नमाला खनके व भद्रावती येथील श्रीधर झंजाळ यांचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह देऊन ना. अहीर यांच्या हस्ते जिल्हा शिक्षक पुरस्काराने सपत्नीक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी राम गारकर यांनी केले. संचालन अर्चना माशीरकर व सावन चालखुरे यांनी तर आभार निरंतरचे उपशिक्षणाधिकारी पाटील यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)
राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांचाही सत्कार
राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर झालेले पोंभुर्णा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद शाळा थेरगावचे सहाय्यक शिक्षक हरिश ससनकर तसेच घुग्घुस येथील प्रियदर्शनी कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्मिता कोकाटे व चिमूर तालुक्यातील कवडशी जिल्हा परिषद शाळेचे सहायक शिक्षक धनराज गेडाम यांचाही ना. हंसराज अहीर यांच्या हस्ते भेटवस्तू व वृक्ष देऊन यावेळी सत्कार करण्यात आला.
तीन शाळांचा सत्कार
ग्रामीण भागातील गुणवत्ता विकास कार्यक्रमात सहभाग घेत उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या पहिल्या तीन शाळांच्या मुख्याध्यापक व शिक्षकांचाही या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. यात प्रथम क्रमांक कोरपना तालुक्यातील जि. प. शाळा पिंपळगावने पटकाविला. तर द्वितीय क्रमांक चिमूर तालुक्यातील कवडशी व तृतीय क्रमांक चंद्रपूर तालुक्यातील खुटाळा शाळेने पटकाविला.