१८ लाखांचा दारूसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:25 IST2021-04-26T04:25:13+5:302021-04-26T04:25:13+5:30
वरोरा : राज्यात लॉकडाऊनच्या काळात कडक नियमावली लागू केली असतानासुद्धा चंद्रपूर जिल्ह्यात येणारी दारू मात्र काही केल्या थांबत ...

१८ लाखांचा दारूसाठा जप्त
वरोरा : राज्यात लॉकडाऊनच्या काळात कडक नियमावली लागू केली असतानासुद्धा चंद्रपूर जिल्ह्यात येणारी दारू मात्र काही केल्या थांबत नसल्याचे चित्र आहे. अशाच एका घटनेत वरोरा पोलिसांनी शनिवारी पहाटे २२ लाख ४३ हजार २०० रुपयांचा दारूसाठा एका वाहनाचा पाठलाग करून जप्त केला.
लॉकडाऊननंतर जिल्ह्याच्या सीमेवर पोलीस चौक्या कार्यरत झाल्या आहेत. त्या ठिकाणी वाहनांची तपासणी करण्यात येते. मात्र अशाही परिस्थितीत दारू तस्कर आपले संधान साधत असून छुप्या मार्गाने दारूचा पुरवठा जिल्ह्यात करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. शनिवारला पहाटे एक विना नंबरप्लेटचे चारचाकी वाहन खांबाडा मार्गे वरोरा शहराकडे येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण रामटेके यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी आनंदवन चौकात नाकाबंदी केली असता सदर वाहन वेगाने पुढे निघून गेले. पोलिसांनी त्या वाहनाचा पाठलाग केला असता चालकाने बोर्डा चौकाच्या पुढे वाहन थांबवून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. पोलिसांनी सदर वाहनाची तपासणी केली असता त्यात १८ लाख ४३ हजार २०० रुपयांची विदेशी दारू असल्याचे आढळले. सदर विदेशी दारू हिंगणघाट आणि समुद्रपूर येथील दारू तस्करांची असल्याचे बोलले जात आहे.