१५ दिवसांत १८ लाखांची दारू जप्त
By Admin | Updated: April 18, 2015 01:09 IST2015-04-18T01:09:33+5:302015-04-18T01:09:33+5:30
१ एप्रिलपासून जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली. मात्र त्यानंतरही दारूचा साठा करून त्याची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या ....

१५ दिवसांत १८ लाखांची दारू जप्त
चंद्रपूर : १ एप्रिलपासून जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली. मात्र त्यानंतरही दारूचा साठा करून त्याची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दारू तस्करांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. गेल्या १५ दिवसांत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याअंतर्गत पोलिसांनी तब्बल १८ लाख २२ हजार २९ रुपयांची दारू जप्त केली. त्यात देशी-विदेशी दारूचा समावेश आहे.
महिलांच्या आंदोलनाचा सन्मान करीत शासनाने जिल्ह्यात दारूबंदी केली. त्यामुळे बंदीच्या या जिल्ह्यात अवैध दारू विक्रीची शक्यता लक्षात घेऊन त्यादृष्टीने जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.राजीव जैन यांनी फिल्डींग लावली. प्रत्येक रस्त्यावर तपासणी नाके उभारण्यात आले. मात्र या तपासणी नाक्यांनाही न जुमानता काहींनी शहरात दारू आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अयशस्वी ठरला. गेल्या १५ दिवसांमध्ये पोलिसांनी दारूसाठे हुडकून काढत तस्करांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईमुळे दारू तस्कर हादरून गेले आहेत. तपासणी नाक्यावर चारचाकी, दुचाकी वाहनांची तपासणी केली जात आहे. चंद्रपूरलगतच्या गडचिरोली, वर्धा या जिल्ह्यात दारूबंदी असली तर दोनही जिल्ह्यात अवैध दारूचा महापूर वाहत आहे. त्यामुळे या जिल्ह्यातून तसेच यवतमाळ जिल्ह्यातूनही चंद्रपूर जिल्ह्यात चोरट्या मार्गाने दारूचा शिरकाव होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी सावधगिरी बाळगली आहे. (प्रतिनिधी)