पोलिसांच्या ‘से नो टू क्राईम’ ला १६९ महाविद्यालयांकडून हमी
By Admin | Updated: August 10, 2016 00:35 IST2016-08-10T00:35:20+5:302016-08-10T00:35:20+5:30
जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी सोमवारी जिल्ह्यातील १६९ कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांत जनजागृती करण्यासाठी...

पोलिसांच्या ‘से नो टू क्राईम’ ला १६९ महाविद्यालयांकडून हमी
चंद्रपूर : जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी सोमवारी जिल्ह्यातील १६९ कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांत जनजागृती करण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या ‘से नो टू क्राईम’ कार्यक्रम राबविला. यादरम्यान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून ‘से नो, टू क्राईम’ची विद्यार्थ्यांकडून हमी घेतली.
पोलीस प्रशासनातर्फे विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्याच्या दृष्टीने एकाच वेळी मार्गदर्शन पर अभियान राबविण्यात आले. ज्यामध्ये ‘से नो टू महिला अत्याचार, से नो टू बाल शोषण, से नो टू वाहतुकीचे उल्लंघन, से नो टू गुंडागर्दी, सो नो टू ड्रग्स, से नो टू आतंकवाद अशा प्रकारच्या घोषवाक्याने संपूर्ण महाविद्यालय परिसर दणाणले.
कार्यक्रमाची सुरुवात पोलीस मुख्यालयात पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या संकल्पनेतील ‘से नो’ या अभियानाबाबत प्रोत्साहनपर मार्गदर्शन सभेद्वारे झाली. यामध्ये पोलीस अधीक्षकांनी अभियानाचा हेतू व्यक्त केला. सकाळी ९ वाजता पोलीस मुख्यालय येथून काढण्यात आलेल्या पायदळ मार्चला हिरवी झेंडी दाखवून चळवळीचा शुभारंभ केला.
या रॅलीमध्ये पोलीस प्रशासनासोबत शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी व पोलीस मित्र, शांतता कमेटीचे सदस्य, स्वयंसेवक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जिल्ह्यातील चार महाविद्यालय स्वत:च्या वाट्याला घेत पोलीस अधीक्षकांनी स्वत: मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थ्यांना निडरपणे पुढे येऊन होणाऱ्या अत्याचाराबाबत माहिती पोलिसांना देण्याबाबत आवाहन केले.
यावेळी प्रत्येक महाविद्यालय स्तरावर एक समिती गठीत करण्यात आली. ज्यामध्ये एक पोलीस अधिकारी, एक प्राध्यापक प्रतिनिधी, पाच विद्यार्थी प्रतिनिधी एक सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते त्याचप्रमाणे पालक वर्गातील दोन प्रतिनिधी यांचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक महाविद्यालयात तक्रारपेटी लावण्यास प्राध्यापकांना प्रोत्साहित करण्यात आले असून या तक्रारींची वेळोवेळी संबंधीत महाविद्यालयाचे प्राचार्य व गठीत समितीद्वारे पाहणी करुन त्याचे निराकरण करण्यात येईल.
यावेळी पोलीस अधीक्षकांसह अपर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत, उपपोलीस अधीक्षक जयचंद्र काटे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रल्हाद गिरी यांच्यासह शहरातील पोलीस ठाण्याचे ठाणेदार, जिल्हा शांतता समितीचे सदस्य विविध संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.