१५ वर्षांपासून केवळ आश्वासनेच
By Admin | Updated: April 30, 2017 00:32 IST2017-04-30T00:32:00+5:302017-04-30T00:32:00+5:30
कोरपना तालुक्यातील अत्यंत वर्दळीचा चंद्रपूर-घुग्घुस रस्त्याला जोडणारा भोयगाव रस्ता गेल्या १५ ते २० वर्षांपासून अद्यापही दुर्लक्षित आहे.

१५ वर्षांपासून केवळ आश्वासनेच
प्रवासी भोगताहेत नरकयातना : ८५ कोटीची मंजुरी, काम मात्र थंडबस्त्यात
नांदाफाटा : कोरपना तालुक्यातील अत्यंत वर्दळीचा चंद्रपूर-घुग्घुस रस्त्याला जोडणारा भोयगाव रस्ता गेल्या १५ ते २० वर्षांपासून अद्यापही दुर्लक्षित आहे. २५ वर्षापूर्वी सदर मार्गावर पुलाचे बांधकाम करण्यात आले. त्यानंतर भोयगाव पूल ते कवठळ्यापर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. हा मार्ग गडचांदूर, भोयगाव, चंद्रपूर असा मुख्य रस्ता असल्याने वाहनांची मोठी वर्दळ सुरू असते. त्याचबरोबर कोरपना तालुक्यात असलेल्या तीनही सिमेंट प्रकल्पातील चार चाकी, सहा चाकी वाहने याच रस्त्याने ये-जा करीत आहे. जडवाहतुकीमुळे रस्त्यावर मोठ-मोठे जीवघेणे खड्डे पडले आहे. यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. सदर रस्त्याच्या मागणीसाठी मागील आॅक्टोबर महिण्यात शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी राजुऱ्याचे आमदार अॅड. संजय धोटे यांनी दोन दिवसापूर्वी सदर रस्त्याच्या बांधकामासाठी ८५ कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती विविध वृत्तपत्रातून दिली. मात्र या कामाला प्रशासकीय मंजुरी नसल्याचा खुलासा आंदोलनादरम्यान अॅड. चटप यांनी केला. त्यानंतर फेब्रुवारी महिण्यापर्यंत काम सुरू करण्यात येणार असल्याचे बांधकाम विभागाने सांगितले होते. मात्र हे आश्वासन हवेतच विरले असून गेल्या १५ वर्षापासून या मार्गाच्या बांधकामाबाबत आश्वासनेच मिळत असल्याच्या प्रतिक्रिया गावकऱ्यामध्ये व्यक्त केल्या जात आहे.
भोयगाव मार्गासाठी ८५ कोटीची मंजुरी मिळाल्याचा कांगावा लोकप्रतिनिधींमार्फत केला गेला. तेव्हा रस्त्याचे काम अजूनही थंडबस्त्यातच का, असा सवाल आता नागरिक करीत आहे. प्रवाश्यांना चंद्रपूर-भद्रावती-घुग्घुस जाणे या मार्गाने सोयीचे पडते. त्यामुळे प्रवाशी मोठ्या प्रमाणात गडचांदूर-भोयगाव रस्त्यांनी प्रवास करतात. पावसाळ्यात खड्यामध्ये पाणी साचत असल्याने अनेक अपघातही यापूर्वी या मार्गावर झाले आहे. ज्यात काहींना मृत्यूला कवटाळावे लागले आहे. दुचाकी वाहनधारकांना गाडी चालविताना पुढच्या वाहनाचा अंदाज घेणे कठीण होत आहे. यापूर्वी गडचांदूर-भोयगाव रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले खरे; परंतु अल्पावधीत रस्त्यावर खड्डे पडले आहे तर भोयगाव फाटा ते भोयगाव पुलापर्यंत १५ वर्षापासून रस्त्याचे काम झालेले नाही. (वार्ताहर)
शाळकरी मुलाचा
झाला होता मृत्यू
याच मार्गावर वाहनांचा अंदाज घेता न आल्याने राजेंद्र विद्यालय भोयगाव येथे शिकणाऱ्या एकोडी येथील शाळकरी मुलाचा ट्रक खाली सापडल्याने एक ते दीड वर्षापूर्वी मृत्यू झाला होता. यानंतरही अनेकदा या मार्गावर अपघाती मृत्यू झालेले आहेत.
धुळीमुळे शेतपिके
धोक्यात
भोयगाव मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतातील शेतपिके धुळीने खराब होत आहे. कापसासारखे पांढरे शुभ्र पीक काळेकुट्ट पडल्यार्चे चित्र दरवषीच दिसत आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
शेतकरी संघटनेचा पुन्हा आंदोलनाचा इशारा
गेल्या चार महिन्यापूर्वी सदर मार्गासाठी ८५ कोटी मंजूर झाल्याचे आमदार अॅड. संजय धोटे यांनी सांगितले. तशी माहितीही वृत्तपत्रातून प्रसिद्ध करण्यात आली. मात्र रस्त्याचे काम अद्यापही झालेले नाही. सदर काम सुरू करण्यात यावे अन्यथा शेतकरी संघटना पुन्हा रस्त्यावर उतरून चक्का जाम आंदोलन अॅड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वात करेल.
- मदन सातपुते,
माजी उपसभापती पं.स. कोरपना