पालिकेला १५ दिवसांचा अल्टीमेटम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2016 00:20 IST2016-08-11T00:20:55+5:302016-08-11T00:20:55+5:30
मुख्य रस्त्यांसह जोडरस्त्यांवर मोकाट जनावरे उभे राहत असल्याने रहदारीला अडथळा होत असून अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही.

पालिकेला १५ दिवसांचा अल्टीमेटम
अध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा : प्रकरण शहरातील मोकाट जनावरांचे
भंडारा : मुख्य रस्त्यांसह जोडरस्त्यांवर मोकाट जनावरे उभे राहत असल्याने रहदारीला अडथळा होत असून अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आज नगरपालिकेत जाऊन अध्यक्ष बाबूराव बागडे व मुख्याधिकारी अनिल अढागळे यांची भेट घेतली. तसेच येत्या १५ दिवसात शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न मार्गी लावावा यावर गंभीरतेने चर्चा केली. यात उभयंतांनी १५ दिवसात हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
जवळपास दीड लक्ष लोकसंख्या असलेल्या भंडारा शहरात लहान सहान समस्या आ वासून उभ्या आहेत. त्यापैकी मोकाट जनावरांची समस्या उग्र रुप धारण करीत आहे. दूषित पाणीपुरवठा, अतिक्रमणाने गजबजलेले रस्ते, रस्त्यावरील जीवघेणे खड्डे या मुख्य समस्या आधीच नागरिकांच्या संयमाचा अंत पाहत आहेत. यावर लहान सहान समस्येवर रामबाण उपाय शोधून काढावा यासाठी शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी दखल घेतली. या उद्देशाने आज पालिकेत दुपारी १ वाजताच्या सुमारास नगरपालिकेचे अध्यक्ष बाबूराव बागडे तथा मुख्याधिकारी अनिल अढागळे यांची भेट घेत गंभीर विषयांवर चर्चा करण्यात आली.
या चर्चेत डॉ.नितीन तुरस्कर, आशू गोंडाणे, नितीन दुरगकर, नितीन साकुरे, मनोज बोरकर, भूपेश तलमले, शमीम शेख यांच्यासह अन्य जणांनी सहभाग नोंदविला. मोकाट जनावरांच्या प्रश्नावर मुख्याधिकाऱ्यांनी येत्या १५ दिवसात कांजी हाऊसचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. त्यासह शहरातील ज्या रस्त्यांची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे असे रस्ते कायमस्वरुपी सिमेंटीकरण करण्याचे प्रस्तावित असल्याचेही याप्रसंगी सांगण्यात आले. येणाऱ्या दिवसात पालिका प्रशासन यावर खरच गांभीर्यता दाखविते काय? याकडे आता सर्वांची नजर आहे. (प्रतिनिधी)