१४ हजार क्विंटल तूर शेतकऱ्यांच्या घरात पडून
By Admin | Updated: June 19, 2017 00:50 IST2017-06-19T00:50:10+5:302017-06-19T00:50:10+5:30
शासनाने ३१ मे पर्यंत तूर खरेदीचे आदेश दिले होते. खरेदीमध्ये गोंधळ निर्माण होवू नये म्हणून कागदपत्रे घेवून येणाऱ्या शेतकऱ्यांना ३१ मे पुर्वीच टोकन दिले ....

१४ हजार क्विंटल तूर शेतकऱ्यांच्या घरात पडून
टोकन मिळाले : खरेदीचा पत्ता नसल्याने शेतकऱ्यांत चिंता
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : शासनाने ३१ मे पर्यंत तूर खरेदीचे आदेश दिले होते. खरेदीमध्ये गोंधळ निर्माण होवू नये म्हणून कागदपत्रे घेवून येणाऱ्या शेतकऱ्यांना ३१ मे पुर्वीच टोकन दिले व तूर खरेदी बंद करण्यात आली. मात्र १ हजार १२ शेतकऱ्यांना टोकन देऊनही मागील काही दिवसांपासून त्यांची तूर खरेदी करण्यात आलेली नाही. परिणामी १४ हजार क्विंटल तूर शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे.
सध्या शासनाची तूर खरेदी बंद करण्यात आली असून तुरीची प्रतवारी खराब होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. तूर खरेदीचे टोकन देवूनही शासन तूर खरेदी करीत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष पसरला आहे. यावर्षी तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले. त्यामुळे बाजारभाव हमी भावापेक्षा कमी झाले म्हणून शासनाने हमी भावाने तूर खरेदी सुरू केली. शासनाच्या खरेदीकडे शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली. त्यामुळे तूर खरेदीची व्यवस्था अनेक ठिकाणी कोलमडली होती.
परिणामी शासनाने काही दिवस तूर खरेदी बंद केली. नंतर पुन्हा खरेदी सुरू करून ३१ मे पर्यंत मुदत देण्यात आली. ३१ मे पर्यंत शेतकऱ्यांनी सातबारा, पेरीवपत्र घेवून नोंदणी केली. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले. ३१ मे पर्यंत १ हजार २०४ शेतकऱ्यांची तूर घेण्यात आली. मात्र अजुनही १ हजार १२ शेतकऱ्यांना टोकन मिळूनही तूर घरातच पडून आहे.
आज ना उद्या तूर खरेदीला प्रारंभ होईल, अशी आशा शेतकरी व्यक्त करीत असताना एक-एक दिवस लोटत आहे. परंतु, अद्यापही तूर खरेदी सुरू करण्यात आली नसल्याने शेतकरी आक्रमक होताना दिसत आहेत. पावसाळा सुरू झाल्याने घरात तुरी ओल्या झाल्यास परत शासन खरेदी करणार नाही, या भितीने शेतकरी तुर्तास त्रस्त झाल्याचे दिसून येते.
शासनाच्या धोरणाने तूर खरेदीवर पाणी
शासनाच्या आदेशाप्रमाणे तूर खरेदी करण्याकरिता हमाल, चाळण्या व २२ हजार रुपये किराया देवून गोडावून घेतले आहे. पावसाळ्यात तुरीला पाणी लागू नये याकरिता यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली. तूर खरेदी सुरू करावी याबाबत शासनाकडे पत्रव्यवहारही सुरू ठेवला आहे. सध्या पेरणीचा हंगाम सुरू झाल्याने शेतकरी व्यस्त झाले आहे. अशाही परिस्थितीत शेतकरी तूर आणण्यास तयार असताना शासनाच्या धोरणाने शेतकरी त्रस्त झाला आहे.
शासनाची चूक, बाजार समितीची फरफट
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शासन तूर खरेदी करीत असते. बाजार समिती हमाल, काटे, चाळनी व गोदाम उपलब्ध करून देतात. शासनाच्या आदेशाने बाजार समितीने शेतकऱ्यांना तूर खरेदीची नोंदणी करून टोकन दिले. मात्र शासनाने तूर खरेदी बंद केली. तूर खरेदी केव्हा सुरू होणार याची विचारणा शेतकरी करतात. परंतु बाजार समितीकडे खरेदीबाबत कुठलीही माहिती शासनाने पुरविली नसल्याने शेतकऱ्यांना उत्तरे देताना दमछाक होताना दिसून येते. शासनाने खरेदी बंद केली असून उत्तर बाजार समितीला द्यावे लागत आहे.