घुग्घुस हत्याकांडातील १४ जणांना अटक
By Admin | Updated: June 29, 2016 01:04 IST2016-06-29T01:04:56+5:302016-06-29T01:04:56+5:30
३ मार्च रोजी घुग्घुस येथील आरीफ मोहम्मद हनिफ मोहम्मद यांच्यावर तीन अनोळखी इसमांनी मोटार सायकलवर येऊन चाकूने प्राणघातक हल्ला केला होता.

घुग्घुस हत्याकांडातील १४ जणांना अटक
मोका अंतर्गत होणार कारवाई : नव्या गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश
चंद्रपूर : ३ मार्च रोजी घुग्घुस येथील आरीफ मोहम्मद हनिफ मोहम्मद यांच्यावर तीन अनोळखी इसमांनी मोटार सायकलवर येऊन चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. ज्यामध्ये आरीफ मोहम्मद यांचा मृत्यू झाला होता. त्यावरुन घुग्घुस पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करुन तपासास सुरुवात झाली. तपासादरम्यान पोलिसांनी सुरुवातीला तीन व नंतर एक-एक करत १४ आरोपींना पकडले आहे. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान चंद्रपुरातील एका नव उदयीत संघटीत गुन्हेगार टोळीचा पर्दाफाश झाला आहे.
या गुन्हेगार टोळीचा प्रमुख असलेला शेख समीर शेख उर्फ राजू येरुरकर यांने आपल्या संघटीत सहकाऱ्यासह भिती, बळाचा वापर करुन दिवसाढवळ्या स्वत:चा व टोळीतील सदस्यांच्या आर्थिक फायद्यासाठी खून, खुनाचा प्रयत्न, दुखापत करणे, गंभीर दुखापत, खंडणी वसुलीचे गुन्हे केले आहे. त्यातून मिळालेल्या उत्पन्नावर स्वत:चे व टोळीतील सदस्यांची उपजिविका, शौक पूर्ण केले. या टोळीच्या प्रत्येक सदस्यांवर चंद्रपूर जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेरही विविध ठिकाणी गुन्हे नोंद असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत कलम वाढ करण्याचा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परीक्षेत्र नागपूर यांना पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्या मार्फत पाठविण्यात आला.
गुन्हेगारी विश्व निर्माण करणाऱ्या टोळीचा बिमोड करण्याची निकड लक्षात घेत पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी त्यांच्यावर मोका कायद्यातंर्गत कलम वाढ करण्याचा व मोका कायद्यांतर्गत तपास करण्याची परवाणगी विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर यांच्याकडून प्राप्त करुन घेतली.
त्यामुळे आता या गुन्ह्याचा तपास मोका अन्वये होणार आहे. या कायद्यानुसार तपास करण्याकरिता सोमवारी न्यायालयाकडून आरोपींना २ जुलैपर्यंत पीसीआर घेण्यात आला. पुढील तपास गडचांदूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर करीत आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)