आपत्ती व्यवस्थापनात १४ बोटी; १५५ लाईफ गार्ड

By Admin | Updated: May 20, 2015 01:47 IST2015-05-20T01:47:27+5:302015-05-20T01:47:27+5:30

पावसाळ्याला लवकरच प्रारंभ होत आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी जिल्हा प्रशासनानेही आपली तयारी सुरू केली आहे.

14 boats in disaster management; 155 Life guard | आपत्ती व्यवस्थापनात १४ बोटी; १५५ लाईफ गार्ड

आपत्ती व्यवस्थापनात १४ बोटी; १५५ लाईफ गार्ड


चंद्रपूर : पावसाळ्याला लवकरच प्रारंभ होत आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी जिल्हा प्रशासनानेही आपली तयारी सुरू केली आहे. यावर्षी आपत्ती व्यवस्थापनात नियंत्रण कक्षासह १४ बोटी, ४१० लाईफ जॅकेट, १५५ लाईफ गार्ड, पाच फ्लोटींग स्ट्रेचर, २५ लाईट, ६० सेफ्टी हेल्मेट व पाच दुर्बिन सज्ज करण्यात आले आहे. मात्र हे आपत्ती व्यवस्थापन ऐनवेळी कामात यावे, यासाठी ते केवळ कागदापुरती मर्यादित ठेवू नका, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी अधिनस्त अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
पुढील महिन्यात पावसाचे आगमन होण्याचा अंदाज आहे. दरवर्षी चंद्रपूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण होते. त्यामुळे अशावेळी आपत्ती व्यवस्थापनाची मोठी गरज भासते. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी येथील बचत साफल्या भवनात मान्सून पूर्व तयारी व आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक घेतली. यावेळी मनपा आयुक्त सुधीर शंभरकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय दैने व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे उपस्थित होते.
प्रत्येक विभागाने आपत्ती व्यवस्थापनाचा स्वतंत्र आराखडा तयार करून नियंत्रण कक्ष स्थापावा व २४ तास संपर्क यंत्रणा कार्यरत ठेवावी, असे निर्देश देतानाच आपत्ती व्यवस्थापन आराखडा कागदापूरताच मर्यादित न ठेवता सकारात्मक मानसिकतेतून आपत्ती व्यवस्थापन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी म्हैसेकर यांनी दिल्या.जिल्हास्तरावर आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली असून प्रत्येक नगर पालिका व तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित करावा व पूर्ण वेळ संपर्क कर्मचारी नेमावा, अशा सूचनाही म्हैसेकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्ह्यात बचाव साहित्य उपलब्ध असून यात १४ बोटी, ४१० लाईफ जॅकेट, १५५ लाईफ बॉय, पाच फ्लोटींग स्ट्रेचर, २५ सर्च लाईट, एक हजार मीटर दोरी, दोन हँड आॅपरेडेट सायरन्स, ६० सेफ्टी हेल्मेट, दोन मेगा फोन व पाच दुर्बीनचा समावेश आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील मान्सून पर्जन्यमान ११४२.०७ मि.मी. एवढे आहे. चंद्रपूर जिल्ह्यात इरई नदी, वर्धा नदी, वैनगंगा नदी व उमा नदी या प्रमुख नद्या असून पुरापासून होणारी हानी टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व अधिकारी व यंत्रणांनी सज्ज राहावे असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिले.
अतिवृष्टीच्या काळात इरई धरणाचे पाणी सोडताना जिल्हा प्रशासनाशी समन्वय ठेवावा असेही ते म्हणाले. यावेळी इतर विभागाचा आढावा घेताना रस्ते, माजी मालगुजारी तलाव, वीज व औषध पुरवठा तसेच धान्य पुरवठा याबाबत दक्षता घेण्यात यावी असे त्यांनी सांगितले. पावसाळ्याची तयारी महानगरपालिकेने केली असून स्वच्छता व नाले सफाई प्राधान्याने करण्यात येणार असल्याचे आयुक्त सुधीर शंभरकर यांनी सांगितले. सोबतच रोगाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी डॉक्टरांचे पथक व भरपूर औषधसाठा उपलब्ध असल्याचे ते म्हणाले. पिण्याच्या पाण्यात ब्लिचिंग पावडर नियमित टाकण्यात येईल असेही ते म्हणाले.
चंद्रपूर शहरातील इरई नदीच्या पात्रात महानगरपालिकेने नवीन बांधकामाना परवानगी देऊ नये, असे निर्देश त्यांनी दिले. जे मनपा अधिकारी बांधकामाना परवानगी देतील, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. पावसाळ्यात सर्व अधिकाऱ्यांनी नियमित संवाद ठेवून आपली व्यवस्थापनाचे कार्य जबाबदारीने पार पाडावे असे ते म्हणाले.
पूरपीडित संभाव्य गावांचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून संकेत स्थळावर टाकावा. तसेच संपर्क तुटणाऱ्या गावांची यादीही टाकावी, असे त्यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)
चंद्रपूरच्या नशिबी असलेल्या यातना दिवस लोटत असले तरी कमी होताना दिसत नाही. चंद्रपुरातील अतिक्रमणामुळे अनेक समस्या निर्माण होत असतानाच बॅक वॉटरचीही समस्या आता गुंतागुंतीची झाली आहे. चंद्रपुरातून वाहणारे मोठे नाले अतिक्रमणात गुडुप झाल्यामुळे यावर्षीदेखील महापालिकेची नालेसफाईची मोहीम केवळ फार्स ठरली आहे. अनेक ठिकाणी मोठ्या नाल्यांपर्यंत जेसीबी मशीन जाऊ शकत नाही. काही ठिकाणी तर मनुष्यबळाचा वापर केल्यानंतरही नाल्यातील गाळ उपसता येऊ शकत नाही. त्यामुळे पावसाचे पाणी थोपून चंद्रपुरात कृत्रिम पूर येण्याची शक्यता आहे. याशिवाय बिनबा गेटजवळ तर मोठ्या नाल्याची भिंतच खचली आहे. ती अद्यापही पाहिजे तशी बांधण्यात आलेली नाही.

 

Web Title: 14 boats in disaster management; 155 Life guard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.