नागभीड येथे १३१ मतदान यंत्र तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:13 IST2021-01-13T05:13:45+5:302021-01-13T05:13:45+5:30
फोटो : उमेदवारांना मतदान यंत्राचे प्रात्यक्षिक करून दाखविताना अधिकारी. नागभीड : मतदान यंत्राविषयी अनेकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत. हे ...

नागभीड येथे १३१ मतदान यंत्र तयार
फोटो : उमेदवारांना मतदान यंत्राचे प्रात्यक्षिक करून दाखविताना अधिकारी.
नागभीड : मतदान यंत्राविषयी अनेकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत. हे गैरसमज दूर करण्याच्या हेतूने येथील तहसील प्रशासनाच्या वतीने मतदान यंत्रांचे उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधीसमोर प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.
यानंतर मतदान यंत्र सील करण्यात आले. यावेळी निवडणुकीस सामोरे जात असलेल्या प्रत्येक ग्रामपंचायतींचे उमेदवार हजर होते. उमेदवार आणि त्यांच्या वाहनांच्या गर्दीने सोमवारी तहसील कार्यालयास जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
नागभीड तालुक्यात निवडणुकीस सामोरे जाणाऱ्या ४३ ग्रा.पं.पैकी दोन ग्रामपंचायतींची निवडणूक अविरोध झाल्याने, आता प्रत्यक्षात ४१ ग्रा.पं.ची निवडणूक होत आहे. यासाठी ७२४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. निवडणूक व्यवस्थित पार पडावी, यासाठी येथील निवडणूक विभाग पुरेपूर काळजी घेत आहे. याचाच एक भाग म्हणून सोमवारी निवडणूक विभागाने आवश्यक असलेले १३१ मतदान यंत्र तयार करून या मतदान यंत्रांचे उमेदवारांसमोर प्रात्यक्षिक करून दाखविले. संध्याकाळी हे मतदान यंत्र सील करून स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात येणार आहेत. नंतर १४ तारखेला त्या त्या गावचे मतदान अधिकारी हे मतदान यंत्र आपापल्या गावी घेऊन जातील. हे मतदान यंत्र, मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी १५ बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेमध्ये जवळजवळ ५५० अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बॉक्स
१३१ पोलिसांची नियुक्ती
मतदान शांततेत पार पडावे, यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर एक याप्रमाणे १३१ पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय महसूल विभागाकडून चार आचारसंहिता पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे आचारसंहिता पथक आपल्या कार्यक्षेत्रात प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवणार आहे.
बॉक्स
६१ उमेदवार अविरोध
यावेळी ४३ ग्रामपंचायतींच्या ३६३ जागांसाठी निवडणूक होणार होती. मात्र दोन ग्रामपंचायतींची अविरोध निवड झाल्याने आणि अन्य ग्रामपंचायतींचे ४५ सदस्य अविरोध निवडून आल्याने, आता प्रत्यक्षात ३०२ सदस्यांसाठीच निवडणूक होणार आहे.
कोट
१५ जानेवारी रोजी पार पडणाऱ्या ४१ ग्रा.पं.च्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज आहे. तयारी सुरू आहे. निवडणुका शांततेत पार पडतील.
- मनोहर चव्हाण , तहसीलदार नागभीड.