नऊ मीटरच्या रस्त्यासाठी १३ वर्षांचा संघर्ष

By Admin | Updated: August 14, 2015 01:22 IST2015-08-14T01:22:35+5:302015-08-14T01:22:35+5:30

बाबुपेठ परिसरातील मोटघरे प्लॉट येथे नऊ मीटरचा रस्ता टाऊन प्लॅनिंगमध्ये मंजूर झाला आहे.

A 13-year struggle for a nine meter road | नऊ मीटरच्या रस्त्यासाठी १३ वर्षांचा संघर्ष

नऊ मीटरच्या रस्त्यासाठी १३ वर्षांचा संघर्ष

मनपाकडून टोलवाटोलवी : किरमे यांचा आरोप
चंद्रपूर : बाबुपेठ परिसरातील मोटघरे प्लॉट येथे नऊ मीटरचा रस्ता टाऊन प्लॅनिंगमध्ये मंजूर झाला आहे. परंतु, जागोजागी अतिक्रमण असल्याने रस्ता झाला नाही. न्यायालयाने अतिक्रमण हटवून रस्ता करण्याचे निर्देश दिले. माात्र तेरा वर्षे लोटूनही रस्ता झालेला नाही. त्यामुळे हटविलेले अतिक्रमण पुन्हा जैसे थे झाले आहे. यासाठी मनपा प्रशासनाची टोलवाटोलवीची भूमिका कारणीभूत असल्याचा आरोप गणपत किरमे यांनी पत्रकार परिषदेत केला.
चांदाफोर्ट बीएनआर रेल्वेस्थानकाच्या मागील भागातील मोटघरे प्लॉट येथे काही नागरिकांनी घरे बांधून वास्तव्य सुरू केले. रेल्वेस्थानकाच्या सुरक्षाभिंतीला लागून नऊ मीटरचा रस्ता टाऊन प्लॅनिंगमध्ये मंजूर करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात रस्त्याचे काम सुरू झाले नाही. त्यामुळे गणपत किरमे यांनी २००२ मध्ये उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. न्यायालयाने २००३ मध्ये अतिक्रमण हटवून रस्ता तयार करण्याचे निर्देश दिले. परंतु तत्कालिन नगरपालिका प्रशासनाने कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे न्यायालयात अवमान याचिका दाखल केली.त्यानंतर नगरपालिकेने रस्त्यावरील अतिक्रमण हटविले. परंतु रस्त्याचे काम सुरू केले नाही. त्यामुळे आजघडीला पुन्हा नागरिकांनी अतिक्रमण केल्याने ये- जा करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा रस्ता तयार करण्यात यावा म्हणून मनपाला अनेकदा निवेदने दिली. परंतु निवेदनांची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. नगर पालिकेने अतिक्रमण हटवून रस्त्याचे काम सुरू करावे, अशी मागणी किरमे यांनी यावेळी केली.रस्त्याच्या पश्चिमेकडे रेल्वेची सुरक्षाभिंत आणि पूर्वेकडे ख्रिश्चन मिशनरीची खासगी जागा आहे. त्यामुळे एका व्यक्तीच्या अतिक्रमणाने हा रस्ता बंद आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: A 13-year struggle for a nine meter road