जिल्ह्यातील ११५ जि.प. शाळांवर संक्रांतीचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:43 IST2021-02-23T04:43:56+5:302021-02-23T04:43:56+5:30
चंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षण विभागाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत असले, तरी चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे ११५ ...

जिल्ह्यातील ११५ जि.प. शाळांवर संक्रांतीचे सावट
चंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षण विभागाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत असले, तरी चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे ११५ शाळांची पटसंख्या १०पेक्षा कमी, तर २८० शाळांची पटसंख्या ११ ते २०च्या दरम्यान आहे. त्यामुळे अशा शाळांवर सक्रांत तर येणार नाही ना, अशी भीती शिक्षकांसह विद्यार्थी व पालकांना जाणवत आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. मात्र, कॉन्व्हेंटच्या वाढत्या संस्कृतीमुळे जि.प.च्या प्राथमिक शाळेतील पटसंख्या कमी होत आहे. त्यातच कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षणपद्धती सुरू झाली आहे. यामध्ये जि.प.च्या तुलनेत कॉन्व्हेंट किती तरी पुढे आहे. त्यामुळे कॉन्व्हेंटची पटसंख्या वाढत आहे, तर दुसरीकडे जि.प. शाळेत कुठे तीन तर कुठे पाच विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने सर्व जिल्हा परिषद शाळांच्या पटसंख्येबाबत अहवाल मागितला होता. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील ११५ शाळांत दहापेक्षा कमी, तर २८० शाळांत ११ ते २०च्या दरम्यान पटसंख्या आहे. त्यामुळे अशा शाळांवर गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत नव्या सत्रात या शाळांचे समायोजन तर करणार नाही ना, असा प्रश्न शिक्षक व पालकांना भेडसावत आहे.
बॉक्स
१३ शाळांचे समायोजन
एका गावात दोन शाळा किंवा मुलांची व मुलींची स्वतंत्र शाळा, तसेच ज्या शाळेत दोन किंवा तीन पटसंख्या होती, अशा जिल्ह्यातील १३ शाळांचे समायोजन करण्यात आले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ११५ शाळांत दहापेक्षा कमी पटसंख्या दिसून येत आहे. त्यामुळे याही शाळांचे समायोजन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोट
जिल्ह्यातील ११५ शाळांची पटसंख्या दहापेक्षा कमी तर २८० शाळांची पटसंख्या ११ ते २० दरम्यानची आहे. अशा शाळांचे एकत्रिकरण किंवा समायोजन करण्याचे कुठलेही निर्देश आले नाही. यापूर्वी कमी पटसंख्या असलेल्या जिल्ह्यातील १३ शाळांचे समायोजन करण्यात आले आहे.
- दीपेंद्र लोखंडे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, जि.प. चंद्रपूर