११५ शेतकरी सावकारी कर्जमुक्त
By Admin | Updated: September 7, 2016 00:47 IST2016-09-07T00:47:36+5:302016-09-07T00:47:36+5:30
विविध कारणांमुळे शेतकऱ्यांना सावकारांकडून कर्ज घ्यावे लागते. शेतकऱ्यांच्या अडचणीचा फायदा घेत...

११५ शेतकरी सावकारी कर्जमुक्त
कर्जाची रक्कम सावकारांना अदा : आणखी प्रकरणे कर्ज मुक्तीसाठी सादर
चंद्रपूर : विविध कारणांमुळे शेतकऱ्यांना सावकारांकडून कर्ज घ्यावे लागते. शेतकऱ्यांच्या अडचणीचा फायदा घेत सावकारही त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वादरात कर्ज वसुल करतात. शेतकऱ्यांच्या या जाचातून सुटका करण्यासाठी शासनाने गेल्या वर्षी सावकारी कर्जमुक्ती योजना सुरु केली होती. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ११५ शेतकरी सावकारी कजार्तून मुक्त झाले आहेत.
गावगाड्यात अजूनही सावकारांकडून पीक कर्जासाठी पैसे घेतले जातात. यातील बरेच सावकार नोंदणीकृत असतात तर काही जण अनधिकृतपणे सावकारीचा व्यवसाय करीत असतात. या सावकारांकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होते. जास्त दरात कर्ज वसुल करण्यासोबतच गहाण वस्तुही सावकारांकडून हडपल्या जातात. सावकाराच्या जाचातून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी गेल्या वर्षी सावकारी कर्जमुक्ती योजना राज्य शासनाने सुरु केली होती.
या योजनेअंतर्गत नोंदणीकृत सावकारांकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करुन सदर कर्ज शासनाच्या वतीने सावकारांना अदा केल्या जाणार होते. त्या अंतर्गत सावकारांकडून कर्ज घेतलेल्या प्रकरणांचा आढावा घेण्याचे काम तालुका व जिल्हा समितीने प्रारंभ केले होते. जिल्ह्यात २४२ परवानाधारक सावकार आहेत. या सावकारांना आपल्याकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची प्रकरणे कर्जमुक्तीसाठी सहकार विभागाच्या तालुकास्तरीय कार्यालयाकडे सादर करावयाची होती. त्याप्रमाणे जिल्ह्यात एकूण ६०८ कर्जमुक्तीची प्रकरणे सादर झाली होती.
सदर प्रकरणे सादर झाल्यानंतर तालुका समितीने बैठक घेवून पात्र प्रकरणे जिल्हा समितीसमोर सादर करावयाचे होते. त्यानुसार प्रस्तावाच्या छाननी अंती १५२ प्रकरणे जिल्हास्तरीय समिती समोर कर्ज माफीसाठी ठेवण्यात आली.
यातील ११५ प्रकरणे जिल्हा समितीने मंजूर केली आहे. मंजूर प्रकरणातील शेतकऱ्यांनी सावकारांकडून घेतलेले ११ लाख ४१ हजार कर्जाची मुद्दल तसेच १ लाख ९२ हजार रूपयाचे व्याज असे एकूण १३ लाख ३३ हजार रुपये शासनाने शेतकऱ्यांच्या कर्जाचे सावकारांना अदा केले आहे. त्यामुळे सदर ११५ शेतकरी पूर्णपणे सावकार कर्जमुक्त झाले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
गहाण वस्तूही परत केले
कर्ज घेताना सावकाराने गहाण म्हणून काही वस्तू ठेवून घेतलेल्या असल्यास त्याही परत करण्याची तरतूद असल्याने अशा वस्तू परत करण्यात आल्या आहेत. आणखी काही प्रकरणे कर्जमाफीसाठी जिल्हा समिती समोर आले असून समितीच्या बैठकीनंतर आणखी काही शेतकरी सावकारी कजार्तून मुक्त होणार आहेत.
खरीप कर्जमाफी करण्याची मागणी
शासनाने शेतकऱ्यांना सावकारी कर्जातून मुक्त केले असले तरी खरिप पीक लागवडीसाठी विविध बँक, सेवा सहकारी सोसायटी यांच्याकडून घेतलेले कर्ज अनेक शेतकऱ्यांचे थकीत आहे. सावकारी कर्जापेक्षा बँकांकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त असून शासनाने कर्जमाफीची घोषणा करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.