११०० फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना शनिवारी कोरोना प्रतिबंधक लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:23 IST2021-01-14T04:23:06+5:302021-01-14T04:23:06+5:30
चंद्रपूर : कोरोना साथरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी केंद्र सरकारने कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या स्वदेशी लसींना मान्यता दिल्यानंतर १६ जानेवारीला ...

११०० फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना शनिवारी कोरोना प्रतिबंधक लस
चंद्रपूर : कोरोना साथरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी केंद्र सरकारने कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या स्वदेशी लसींना मान्यता दिल्यानंतर १६ जानेवारीला देशभरात लसीकरणाची तयारी सुरू झाली. या देशव्यापी मोहिमेंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातही आरोग्य प्रशासनाने यंत्रणा सज्ज केली. शनिवारी ११०० फ्रंटलाईन आरोग्य व अन्य कर्मचाऱ्यांना ११ केंद्रांमध्ये प्रत्यक्षात कोरोनाची लस देण्यात येणार आहे.
केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाने आदेश दिल्यानंतर दोन आठवड्यापूर्वी जिल्हा प्रशासनाने आरोग्य कर्मचारी यादी तयार केली. कोविड १९ प्रतिबंधाची लस सर्वात आधी आरोग्य विभागातील डॉक्टर, आरोग्यसेविका, कर्मचारी व अन्य फ्रंटलाईन अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशासनाने १६ हजार १०९ कर्मचाऱ्यांची यादी अपडेट केली. नवीन सूचनेनुसार, जिल्ह्यातील ११ केंद्रांमध्ये प्रत्येकी १०० याप्रमाणे केवळ ११०० आरोग्य कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यातील फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांची यादी आरोग्य विभागाकडे आली नाही, अशी माहिती सूत्राने दिली. या यादीत संरक्षण विभाग, पोलीस, महानगरपालिका, नगरपंचायतमधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
असे आहेत लसीकरणाचे केंद्र
चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात चार तसेच चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालय, राजुरा, वरोरा, चिमूर, मूल उपजिल्हा रूग्णालय, ब्रह्मपुरी ग्रामीण रुग्णालय, दुर्गापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधासाठी प्रत्यक्ष लसीकरण केले जाणार आहे.
लसीकरणासाठी तीन गट
पहिला गटात शासकीय आरोग्यसेवक कर्मचारी, बालविकास प्रकल्पातील कर्मचारी यांचा समावेश आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी नऊ गटात वर्गीकरण केल्याची चर्चा आहे. दुसऱ्या गटात फ्रंटलाईन वर्कर्स. यात पोलीस, गृहरक्षक दल, नागरी सुरक्षा संस्थांचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवक मनपा कर्मचारी तर तिसऱ्या गटात ५० वर्षांवरील व्यक्ती व विविध व्याधी असणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
अनिश्चितीमुळे भीती आणि मानसिक दडपण
पहिल्यांदा लस घेणाऱ्यांची यादी तयार झाली. मात्र, त्यांची नावे गोपनीय ठेवण्यात आली. त्यामुळे फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांच्या मनातच प्रचंड भीती आणि मानसिक दडपण आहे. कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यास अनिष्ट परिणाम होणार काय, पहिल्याच यादीत नावे असेल तर अचानक उद्भवलेल्या संकटाला सामोरे कसे जायचे, अशा विविध प्रश्नांमुळे अस्वस्थ असल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर काही कर्मचाऱ्यांनी लोकमतला दिली.