राजुरा तालुक्यातील ११ गावांची शिवार योजनेसाठी निवड
By Admin | Updated: April 30, 2015 01:26 IST2015-04-30T01:26:06+5:302015-04-30T01:26:06+5:30
राज्यात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत विविध कामे हाती घेतली जात असून याअंतर्गत सद्याच्या जलस्त्रोतांचे बळकटीकरण, नव्या स्त्रोताचा शोध,

राजुरा तालुक्यातील ११ गावांची शिवार योजनेसाठी निवड
राजुरा : राज्यात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत विविध कामे हाती घेतली जात असून याअंतर्गत सद्याच्या जलस्त्रोतांचे बळकटीकरण, नव्या स्त्रोताचा शोध, नव्या बंधाऱ्याचे बांधकाम, कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती आदी कामे हाती घेतली जात आहेत. याकरिता पहिल्या टप्प्यात चंद्रपूर जिल्ह्यातील २१८ गावांत ही योजना राबविली जाणार असून राजुरा तालुक्यातील ११ गावांची निवड या अभियानासाठी करण्यात आली आहे.
चार्ली ग्राम पंचायत अंतर्गत चार्ली आणि निर्ली तसेच या परिसरातील साखरी या तीन गावांचा यात समावेश असून भेंडवी, कोष्टाळा, खातोडा, सिंदी नलफडी, कळमान, निंबाळा, पाचगाव आणि विरूर अशी इतर गावांची नावे आहेत. शेत सिंचनाकरिता कोणत्याही सुविधा नसलेल्या वर्धा नदी पट्यातील गावांचा या योजनेत समावेश व्हावा याकरिता काँग्रेसचे उमाकांत धांडे यांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा केला होता. तालुक्यातील काही गावात सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी यासाठी बंधारे बांधण्यात आले असले तरी, बंधाऱ्यातील पाणी अडविण्याकरिता लोखंडी फळ्या नसल्याने बंधारे केवळ शोभेची वस्तु ठरत आहेत.
अशात आता जलयुक्त शिवार योजनेतून बंधाऱ्यांची डागडुजी तथा दुरुस्तीची तरतुद आहे. या अंतर्गत निर्ली येथे लगतच्या नाल्यावर नवीन दोन सिमेंट प्लग बंधारा बांधकामाकरिता सर्व्हेक्षण देखील करण्यात आले आहे. संबंधित गावातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)