११ लाख ६५ हजार मतदारांनी बजावला हक्क

By Admin | Updated: October 16, 2014 23:21 IST2014-10-16T23:21:27+5:302014-10-16T23:21:27+5:30

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ११ लाख ६५ हजार ६०६ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी ६६.२६ एवढी आहे. ब्र्र्रह्मपुरी विधानसभा मतदार क्षेत्रात सर्वाधिक ७४.८७ टक्के

11 lakh 65 thousand voters claim rights | ११ लाख ६५ हजार मतदारांनी बजावला हक्क

११ लाख ६५ हजार मतदारांनी बजावला हक्क

चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ११ लाख ६५ हजार ६०६ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी ६६.२६ एवढी आहे. ब्र्र्रह्मपुरी विधानसभा मतदार क्षेत्रात सर्वाधिक ७४.८७ टक्के मतदान झाले, तर चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात सर्वात कमी म्हणजे ५४.०७ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली.
विशेष म्हणजे, मतदार जागृतीसाठी जिल्हा प्रशासनाने विविध प्रयत्न केले. एवढेच नाही तर, जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: सायकल रॅली काढून मतदान करण्याचे आवाहन केले होते. यानंतरही चंद्रपूरातील मतदारांची उदासिनता दिसून आली. विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सहाही विधानसभा क्षेत्रात १०७ उमेदवार रिंगणात होते. या उमेदवाराचे नशिब ईव्हीएम मध्ये बंद झाले आहे. आता उमेदवारांसह नागरिकांचे लक्ष १९ आॅक्टोबर रोजी लागणाऱ्या निकालाकडे आहे.
राजुरा ७०.८० टक्के, चंद्रपूर ५४.०७ टक्के, बल्लारपूर ६३.१८ टक्के, ब्रह्मपुरी ७४.८७ टक्के, चिमूर ७४.५५ टक्के व वरोरा ६४.८१ टक्के मतदान झाले. एकूण ११ लाख ६५ हजार ६०६ मतदारांनी विधानसभा मतदार संघासाठी मतदान केले. यात ६ लाख १५ हजार ७३० पुरुष तर, ५ लाख ४९ हजार ८७६ महिलांचा समावेश आहे. पुरुषांची मतदानाची टक्केवारी ६७.३७ टक्के तर महिलांची मतदानाची टक्केवारी ६५.०६ एवढी आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत राजुरा ६७.३४, चंद्रपूर ५०.०४, बल्लारपूर ६१.१३, ब्रह्मपुरी ६६.९७, चिमूर ७१.७९ व वरोरा ६३.९६ असे एकूण ६३.५३ टक्के मतदान झाले होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राजुरा ६८.८७, चंद्रपूर ५४.७९, बल्लारपूर ६१.३१, वरोरा ६२.७६, ब्रह्मपुरी ७१.१६ व चिमूर ७१.७७ टक्के मतदान झाले होते. विधानसभा निवडणुकीची मतमोजणी १९ आॅक्टोबरला होणार आहे. ७०-राजुरा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था राजुरा, ७१-चंद्रपूर जिल्हा उद्योग भवन (नवीन इमारत) चंद्रपूर, ७२-बल्लारपूर- उपविभागीय अधिकारी कार्यालय मूल, ७३-ब्रह्मपुरी- शासकीय तंत्र निकेतन नागभीड रोड ब्रह्मपुरी, ७४-चिमूर राजीव गांधी भवन तहसील कार्यालय परिसर चिमूर व ७५-वरोरा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वरोरा या ठिकाणी त्या त्या मतदार संघाची मतमोजणी होणार आहे.(नगर प्रतिनिधी)

Web Title: 11 lakh 65 thousand voters claim rights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.