११ गटविकास अधिकारी रडारवर

By Admin | Updated: August 19, 2016 01:49 IST2016-08-19T01:49:50+5:302016-08-19T01:49:50+5:30

जिल्ह्यात १५ आॅगस्टपर्यंत १०३ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते.

11 Group Development Officer on Radar | ११ गटविकास अधिकारी रडारवर

११ गटविकास अधिकारी रडारवर

कारणे दाखवा : स्वच्छ भारत मिशनचे काम रेंगाळले
चंद्रपूर : जिल्ह्यात १५ आॅगस्टपर्यंत १०३ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु तीन पंचायत समित्या वगळता इतर पंचायत समित्यांनी दिलेले उद्दिष्ट गाठले नाही. स्वच्छ भारत मिशनच्या कामात हयगय करणाऱ्या गडविकास अधिकाऱ्यांना (बीडीओ) जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीसचे उत्तर तीन दिवसांमध्ये सादर करायचे आहे. तसेच पुढील काळात उद्दिष्ट पूर्ण करण्याची तंबी देण्यात आली आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मिशनला सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. या मिशनच्या प्रचारासाठी सेलिब्रटी व्यक्तींची मदत घेतली जात आहे. संपूर्ण देशभरात राबविण्यात येणारे स्वच्छता मिशन चंद्रपूर जिल्हा परिषदेतही राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागातर्फे प्रत्येक पंचायत समितीला स्वच्छ भारत मिशनकरिता ग्रामपंचायती दत्तक देण्यात आल्या आहेत. त्या पंचायत समित्यांना १५ आॅगस्ट स्वातंत्र्य दिनापर्यंत गावे हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. डी. सिंह यांनी दिले आहे.
मुख्य कार्यकरी अधिकारी सिंह यांनी १५ आॅगस्टची मुदत दिल्यानंतरही काही गटविकास अधिकाऱ्यांनी स्वच्छता मिशनला प्राधान्य दिले नाही. ही बाब सिंह यांनी मनावर घेतली असून संबंधीत बीडीओंना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. ग्रामपंचायती दत्तक घेऊनही काही गटविकास अधिकाऱ्यांनी त्या ग्रामपंचायतच्या हागणदारीमुक्तीकडे लक्ष दिले नाही. त्याकडे दुर्लक्ष करणे आता त्यांना भोवले आहे. (प्रतिनिधी)

७७ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांना १५ आॅगस्टपर्यंत १०३ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी केवळ ७७ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त करण्यात आल्या आहेत. काही गटविकास अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी पार पाडली नाही. त्यामुळे त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी एम. डी. सिंह यांनी रडारवर घेतले आहे.

तीन बीडीओंचा गौरव
१५ आॅगस्टपर्यंत दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यात तीन गटविकास अधिकारी यशस्वी ठरले आहेत. त्यापैकी दोन गटविकास अधिकारी सध्या जिल्ह्यात कार्यरत आहेत. त्यामध्ये ब्रह्मपुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश तोडेवार, सिंदेवाही पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्याम बोकडे आणि भद्रावती पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी संदीप गोडशेलवार यांचे सीईओ सिंह यांनी अभिनंदन केले आहे.

पंधरवाड्याचे नियोजन
जानेवारी २०१८पर्यंत संपूर्ण जिल्हा हागणदारीमक्त करण्याचे उद्दिष्ठ निश्चित करण्यात आले आहे. त्याकरिता १५ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यातील १०३ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त करण्यासाठी पंधरवाड्याचे नियोजन करण्यात आले होते. हे पंधरवाड्याचे नियोजन काही गटविकास अधिकाऱ्यांनी सीईओंकडे पाठविले नाही. त्यानुसार, हागणदारीमुक्तीसाठी नियोजन केले नाही. त्यामुळे त्यांना उद्दिष्ट गाठता आले नाही.

पंतप्रधानांनी प्राधान्यक्रमाने स्वच्छ भारत मिशन कार्यक्रम राबविला आहे. त्यानुसार, जिल्ह्यातही पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर नियोजन करून त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. सर्व गटविकास अधिकाऱ्यांनी कामात हयगय केलेली चालणार नाही. त्यांनी वेळेत उद्दिष्ट पूर्ण करावे.
- एम. डी. सिंह,
मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद, चंद्रपूर.

 

Web Title: 11 Group Development Officer on Radar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.