साडेपाच हजार कुटुंबांंना मिळाला १०० दिवस रोजगार
By Admin | Updated: February 22, 2017 00:46 IST2017-02-22T00:46:46+5:302017-02-22T00:46:46+5:30
बेरोजगार मजुरांच्या हाताला काम मिळावे यासाठी शासनाने महात्मा गांधी रोजगार हमी ही महत्वाकांक्षी योजना सुरू केली.

साडेपाच हजार कुटुंबांंना मिळाला १०० दिवस रोजगार
रोजगार हमी योजना : कोरपना तालुक्यात फक्त २५ कु टुंबांना काम
चंद्रपूर : बेरोजगार मजुरांच्या हाताला काम मिळावे यासाठी शासनाने महात्मा गांधी रोजगार हमी ही महत्वाकांक्षी योजना सुरू केली. या योजनेतून सुरू असलेल्या कामांवर लाखो मजूर काम करीत असतात. त्यानुसार २०१६-२०१७ या आर्थिक वर्षात चंद्रपूर जिल्ह्यातील समारे पाच हजार ४८८ कुटुंबांना रोजगार उपलब्ध झाला. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे १ लाख ९३ हजार ४८९ मजुरांना रोजगार मिळाला.
दुष्काळातील मनुष्यबळ हाताळणीची एक उपाययोजना म्हणून महाराष्ट्रात रोजगार हमीची योजना सुरु करण्यात आली. त्यामध्ये तेंडुलकर समितीने दिलेल्या अहवालानुसार महाराष्ट्रातील एकूण २७७ लाख गरीब ग्रामीण लोकांना रोजगार देण्याचा मुख्य उद्देश ठेऊन रोजगार हमी योजनेला सुरुवात करण्यात आली. त्यानुसार मागेल त्याला रोजगार, या धोरणाच्या आधारे जॉबकार्डधारकांना रोहयोची कामे देण्यात येतात.
ज्यावेळेस मजुरांकडून कामाची मागणी केली जाते, त्यावेळेस साधारणत: रोहयोची कामे सुरु केली जातात. जर मजुरांंना रोजगार उपलब्ध झाला नाही. मजुरांना रोजगार भत्ता द्यावा लागतो. मात्र यावर्षी जशी कामाची मागणी झाली, प्रमाणे कामे देण्यात आली. ५ हजार ४८८ कुटुंबांना रोजगार उपलब्ध झाला. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे १ लाख ९३ हजार ४८९ मजुरांना रोजगार मिळाला.
त्यानुसार ब्रह्मपुरी तालुक्यात सर्वात जास्त एक हजार १३० कुंटुबांंना शंभर दिवस रोजगार देण्यात आला. त्यानंतर नागभीड तालुक्यात ८५४ कुटुंबाना रोजगार देण्यात आला.तर कोरपना तालुक्यात सर्वात कमी २५ कुंटुबाना रोजगार मिळाला, तर त्यानंतर बल्लारपूर तालुक्यातील ३० कुटुबांना रोजगार देण्यात आला. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील एक लाख ९३ हजार ४८९ मजुरांना रोजगार मिळाला. (नगर प्रतिनिधी)
दुष्काळग्रस्त भागात मिळणार दीडशे दिवस काम
‘मागेल त्याला काम’ असे ब्रिद असलेल्या या योजनेच्या जॉब कार्डधारकांना शासन नियमानुसार १०० दिवस काम देण्यात येत होते. परंतु दुष्काळी वर्ष म्हणून केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने दुष्काळग्रस्त भागातील रोहयो मजूरांना १०० दिवस ऐवजी १५० दिवस काम देण्यात येणार आहे.