एका रॉयल्टीवर १० ट्रॅक्टर रेती वाहतूक
By Admin | Updated: February 15, 2015 00:49 IST2015-02-15T00:49:00+5:302015-02-15T00:49:00+5:30
तालुक्यात रेतीघाट सुरू करण्यात आले आहेत. या रेतीघाटावरुन शासनाने ठरवून दिलेल्या अटींना बगल देवून रोज पोकलॅडवरुन शेकडो ब्रॉस रेतीचा अवैध उपसा करण्यात येत आहे.

एका रॉयल्टीवर १० ट्रॅक्टर रेती वाहतूक
चिमूर : तालुक्यात रेतीघाट सुरू करण्यात आले आहेत. या रेतीघाटावरुन शासनाने ठरवून दिलेल्या अटींना बगल देवून रोज पोकलॅडवरुन शेकडो ब्रॉस रेतीचा अवैध उपसा करण्यात येत आहे. त्यामुळे महसूल विभागाला दररोज लाखो रूपयांचा फटका बसत असून अवैध उपसा करणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख गजानन बुटके यांनी पत्रकार परिषदेत केली.
शासनाने रेतीच्या अवैध उपसावर आळा बसावा याकरीता अनेक नियम लावले व उपसा पारदर्शक कसे होईल याकरीता प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, चिमूर तालुक्यातील शेडगाव गावाजवळील रेती घाटावरुन शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त ब्रॉस रेतीचा उपसा करण्यात येत आहे. तसा रेतीचा उपसा जमिनीच्या तीन फुट पर्यंत करायला पाहिजे. मात्र जमिनीच्या खोलवर दहा फुटापर्यंत रेतीचा उपसा करण्यात येत आहे. त्यामुळे तालुक्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
शासनाने ठरवून दिलेल्या रॉयल्टी किंमतीपेक्षा जास्त किंमत आकारत असल्याने ग्राहकांची लुट होत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना बांधकाम करण्याकरीता आर्थिक फटका बसत आहे. रेतीचा उपसा करण्यासाठी शासनाने जेसीपी पोकलॅडवर बंदी केली आहे. मात्र चिमूर तालुक्यातील शेडेगाव घाटावर चक्क पोकलॅडद्वारे रेतीचा उपसा करण्यात येत आहे, असे बुटके यांनी यावेळी सांगितले.
लिलाव झालेल्या घाटाचे सीमांकन महसूल विभागाने द्यायला पाहिजे. मात्र या घाटावर रेती उपसा करण्याची सीमा नसल्याने जागेव्यतिरिक्त रेती उपसा रेती घाटधारकाकडून होत आहे. त्यामुळे शासनाला लाखो रुपयाचा फटका बसत आहे.
रेतीघाटांवर सर्रास नियमांचे उल्लंघन होत असून रेती घाटांची चौकशी करुन दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी गजानन बुटके यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)