सीटीपीएसच्या कंत्राटदारावर १० टक्के दंडाची शिफारस
By Admin | Updated: September 10, 2015 00:58 IST2015-09-10T00:58:32+5:302015-09-10T00:58:32+5:30
चंद्रपूर वीज केंद्राच्या वॉटर टँक परिसरात सुरू असलेल्या सेटलिंक टँकच्या कामाचा कालावधी तीन महिन्यांचा असताना दीड वर्षांपासून काम पूर्ण करण्यात आलेले नाही.

सीटीपीएसच्या कंत्राटदारावर १० टक्के दंडाची शिफारस
शासकीय लेखा परीक्षकाची शिफारस : तीन महिन्याचे काम १९ महिने लोटूनही अपूर्ण
चंद्रपूर : चंद्रपूर वीज केंद्राच्या वॉटर टँक परिसरात सुरू असलेल्या सेटलिंक टँकच्या कामाचा कालावधी तीन महिन्यांचा असताना दीड वर्षांपासून काम पूर्ण करण्यात आलेले नाही. ते काम निकृष्ठ दर्जाचे असल्याचा ठपका ठेवत शासकीय लेखा परीक्षकाने कंत्राटदारावर मूळ किंमतीच्या १० टक्के दंड ठोठावण्यात यावा, अशी शिफारस महानिर्मितीकडे केली आहे.
सेटलिंक टँकची मूळ किंमत ७० लाख रुपये आहे. २९ जानेवारी २०१४ ला तिरुपती कन्स्ट्रक्शनला वर्क आॅर्डर देण्यात आला. वर्कआॅर्डर मिळाल्यानंतर तीन महिन्यांच्या कालावधीत कंत्राटदाराला हे काम पूर्ण करून द्यावयाचे होते. मात्र, १९ महिने उलटूनही काम पूर्ण झालेले नाही.
वीज केंद्राच्या वॉटर टँकमध्ये राखमिश्रीत पाणी जाऊ नये म्हणून सेटलिंक टँक तयार केली जात आहे. टाकाऊ पाण्यातून मोठ्या प्रमाणात राखमिश्रीत पाणी पॉवर हाऊसमध्ये जात असल्याची ओरड झाली होती. त्यामुळे सेटलिंक टँक निर्माण करण्याचा प्रस्ताव पुढे आला. सेटलिंक टँकद्वारे पाणी अडवून राख बाजूला करायची आणि पाणी पॉवरहाऊसकडे वळते करण्याची ही योजना आहे.
लेखा परीक्षण विभागाने २०१४ मध्ये केलेल्या आॅडिटमध्ये या कामात मोठा गैरव्यवहार झाल्याची बाब पुढे आली. तिरुपती कन्स्ट्रक्शन कंपनीने सादर केलेल्या बिलांवरसुद्धा आक्षेप घेण्यात आला आहे. काम अपूर्ण असताना अवास्तव बिले जोडण्यात आली. तसेच कामाचा दर्जासुद्धा अत्यंत निकृष्ट आहे.
त्यामुळे तिरुपती कन्स्ट्रक्शन कंपनीचे या कामाचे देयक अडवून ठेवण्यात आले आहे. या कामाचा निकृष्ट दर्जा आणि काम वेळेत पूर्ण करून न दिल्याने तिरुपती कन्स्ट्रक्शनवर १० टक्के दंड ठोठावण्यात यावा, अशी शिफारस लेखा परीक्षण विभागाने केली आहे. लेखा परीक्षण विभागाची ही शिफारस महानिर्मितीकडे गेल्या आठ महिन्यांपासून पडून आहे. मात्र, अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. (स्थानिक प्रतिनिधी)